For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशाचे भूषण

06:10 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशाचे भूषण
Advertisement

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा झाली असून, यामध्ये विविध क्षेत्रातील 131 मान्यवरांचा समावेश असल्याचे  दिसते. यामध्ये  दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, व्ही. अच्युतानंदन यांच्यापासून ते तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांच्यापर्यंत अनेक महनीयांचा समावेश होणे, ही निश्चितच समाधानकारक बाब म्हणता येईल. चित्रपटसृष्टीमध्ये धर्मेंद्र यांनी एक काळ गाजवला. लाजराबुजरा, रोमँटिक नायक ते हीमॅन हा त्याचा प्रवास आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. अलीकडेच या लाडक्या नायकाने सर्वांना कायमचा निरोप दिला. त्यांच्या हयातीत हा पुरस्कार मिळाला असता, तर अधिक आनंद झाला असता. व्ही. अच्युतानंदन यांच्याबाबतीतही असेच म्हणता येईल. डाव्या चळवळीतील त्यांचे योगदान अमूल्य असून, केरळचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय म्हणून गणली जाते. सर्वाधिक साक्षर व विकसित राज्य म्हणून केरळकडे पाहिले जाते. केरळला वरच्या स्थानावर नेण्यात अच्युतानंदन यांचीही भूमिका महत्त्वाची होती, हे विरोधकही नाकारणार नाहीत. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा होते. कला, उद्योग, विज्ञान, कृषी, सामाजिक कार्य, आरोग्य तसेच क्रीडासह विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा या माध्यमातून गौरव करण्यात येत असतो. या वर्षीच्या उर्वरित यादीवर नजर टाकली, तरी डोळ्यासमोर या महनीय व्यक्ती आणि त्यांचे कार्य उभे राहते. पीयूष पांडे, उदय कोटक, अलका याज्ञिक यांनी आपापल्या क्षेत्रात भरीव कामे केली. हे पाहता त्यांची निवड योग्यच म्हणावी लागेल. यादीमध्ये महाराष्ट्रातील 15 जणांनाही स्थान देण्यात आले आहे, ही आपल्यासाठी सुखावणारी बाब होय. यातील तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांची निवड म्हणजे लोककलेचाच गौरव म्हटला पाहिजे. आपले संपूर्ण आयुष्य तमाशाला कलेला समर्पित करणाऱ्या कांताबाई सातारकर व तुकाराम खेडकर यांचे पुत्र रघुवीर हे पुत्र. आईवडिलांकडून समृद्ध वारसा लाभलेल्या रघुवीर यांनी आपले आयुष्य तमाशा कलेसाठी वेचले. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर ही लोककलावंतांची भूमी. याच संगमनेरच्या भूमिपुत्राने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या लोककलेसाठी जे काही केले, त्याला तोड नाही. खरे तर तमाशाकडे पाहण्याचा पांढरपेशी समाजाचा दृष्टीकोन कधीच चांगला नव्हता. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही खेडकर कुटुंबीयांनी आपली साधना थांबवली नाही. हे पाहता त्यांना मिळालेली पद्मश्री, हा वास्तविक तमाशाचाच सन्मान ठरतो. सुनीता गोडबोले आणि डॉ. रामचंद्र गोडबोले यांचेही सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असेच. छत्तीसगडमधील बस्तरसारख्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात आदिवासींच्या आरोग्य, कूपोषण निर्मूलन आणि शिक्षणासाठी मागच्या जवळपास साडेतीन दशकांपासून हे दांपत्य कार्यरत आहे. आदिवासींचे जीवनमान उंचावण्याबरोबरच त्यांच्यापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी त्यांनी अविरत काम केले आहे. त्याचबरोबर सामाजिक जागृती घडवून आणण्यामध्येही मोलाचा वाटा उचलला आहे. म्हणूनच त्यांचा सन्मानही तितकाच मोलाचा ठरतो. आदिवासी संस्कृतीचा उद्घोष करणाऱ्या तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांची निवडही वैशिष्ट्यापूर्ण होय. धिंडा यांचा जन्म आदिवासी गरीब कुटुंबातला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही तारपा नावाचे वाद्य वाजवायचे. त्यांच्याकडूनच त्यांनी या वाद्याचे धडे घेतले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी तारपा हातात घेतला. तो 92 वर्षे पूर्ण केल्यानंतरही अद्याप सोडलेला नाही. लहानपणी ते गुरे चरायला नेत आणि तिथेच तारपा वादन करत. पुढे तारपा तयार करणे आणि त्याचे वादन करणे, हा त्यांच्या आयुष्याचा मुख्य भाग बनला. तारपा वादनाद्वारे चांगले पीक येऊ दे, आमचे सर्वांचे रक्षण कर, असे गाऱ्हाणे देवापुढे मांडले जाते. भिकल्या धिंडा यांच्या घरात 150 वर्षांची तारपा वादनाची परंपरा आहे. आदिवासी संस्कृतीचा गाभा असलेली ही परंपरा त्यांनी केवळ पुढे नेली नाही, तर ती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे तिला लोकाश्रय आणि राजाश्रयही मिळू शकला. वास्तविक तारपा वादन ही अतिशय अवघड कला आहे. पण, वयाच्या नव्वदीतही भिकल्या धिंडा प्रामाणिकपणे आणि निष्ठेने ही वादन सेवा करतात. आजही छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या या माणसाचा उद्देश आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे, हाच आहे. आदिवासी संस्कृती ही मुळात निसर्ग पूजक आहे. निसर्गाचा आदर राखणे, समृद्ध परंपरांचे संवर्धन करणे, हा या संस्कृतीचा गाभा आहे. भिकल्या धिंडा यांच्यासारख्या माणसांमुळे आज ही संस्कृती जिवंत आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे त्यांना मिळालेला पुरस्कार वेगळा ठरतो. क्रीडा क्षेत्रामध्ये रोहित शर्मा व हरमनप्रीत कौर यांचा झालेला गौरही यथोचित. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कपिल देव, सौरभ गांगुली, एम. एस. धोनी यांच्यासह अनेक कर्णधारांनी संघाच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिले. रोहितही त्यांच्याच समृद्ध परंपरेतील कर्णधार. सर्वस्व पणाला लावून खेळणे, हा रोहितचा स्थायीभाव. याच वीजिगीषू वृत्तीच्या बळावर त्याने भारताला विश्वकरंडक मिळवून देण्याची किमयाही केली आहे. हरमनप्रीत कौर हिने महिला क्रिकेटला वेगळे वळण दिले. मिताली राजच्या काळात महिला संघ पुढे आला आणि हरमनच्या काळात या संघाने इतिहास घडवला. मागील वर्षी प्रथमच भारतीय संघाने विश्वकरंडकावर आपले नाव कोरले. त्यामुळे त्यांची निवडही आनंददायी. याशिवाय देशाकरिता अपूर्व योगदान दिलेल्या अनेक पद्म मानकऱ्यांचेही अभिनंदन.

Advertisement

Advertisement
Tags :

.