घराची किंमत केवळ दहा हजार
घरे किंवा सदनिका यांच्या किमतींनी सध्या कळस गाठला आहे. महानगरीय भागात एका छोट्या सदनिकेलाही कोटीच्या घरात पैसे मोजावे लागत आहेत. तथापि, या जगात एक स्थान असे आहे, की जिथे आपण स्वप्नातही कल्पना करु शकणार नाही, इतक्या कमी दरात सदनिका किंवा फ्लॅट उपलब्ध आहेत. हे स्थान रशियातील आर्क्टिक नामक शहर हे आहे. या शहरात अक्षरश: कवडीमोलाने सदनिका मिळत आहेत. तथापि, आश्चर्य असे की, घ्यायला ग्राहकच येत नाहीत.
येथे केवळ सदनिका मिळतात असे नाही, तर त्या अत्यंत सुसज्ज स्थितीत मिळतात. फर्निचर आणि इतर फिक्स्चर्ससह त्या मिळतात. वीज, पाणी आदी सुविधाही आहेतच. तरीही ग्राहक मात्र मिळत नाहीत. येथे फ्लॅटची किंमत 10 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. अशा हजारो सदनिका रिकाम्या पडलेल्या आहेत. एव्हढ्या सुविधा आणि तरीही इतकी कमी किंमत असूनही या सदनिकांना ग्राहक का मिळत नाहीत, असा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर येथील हवामानात दडलेले आहे. जगाच्या या भागात तापमान अतिशय कमी आहे. हिंवाळ्यात तर ते शून्याखाली साठ अंश इतके खाली जाते. अशा स्थितीत सर्वसामान्य माणसाला येथे वास्तव्य करणे ही जवळपास अशक्य बाब आहे. येथे वीजेचा पुरवठा आहे. पण घर उष्ण राखण्यासाठी इतकी वीज लागते, की तिचा खर्च सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे सदनिकेची किंमत कमी असली, तरी ती सदनिका वर्षभर राहण्यासाठी योग्य राखण्याचा खर्च इतका आहे, की तेथे वास्तव्य करणे शक्य होत नाही. मग अशा स्थानी इतक्या सदनिका बांधल्या कशासाठी आहेत, हा प्रश्न अनेकजण विचारतात. काही दशकांपूर्वी येथे खाणव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होता. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात लोक वास्तव्यास होते. ते सर्व खाणींमध्ये कामाला होते. त्यांच्या निवासासाठी येथे या सदनिका निर्माण करण्यात आल्या आहेत. तथापि, काही दशकांच्या नंतर येथील उद्योग आणि खाणकाम यांना उतरती कळा लागली. त्यामुळे कर्मचारीही हा भाग सोडून इतरत्र वास्तव्यास गेले. त्यामुळे त्यावेळी बांधलेली शेकडो निवासी संकुले ओस पडली आहेत. इतर सर्व सुविधा असूनही उद्योग बंद पडल्यामुळे येथे राहून काही उपयोग नाही असे लोकांचे मत मत आहे. त्यामुळे सदनिकांची किंमत घटून जवळपास शून्यावर आली आहे. तरीही ग्राहक नाहीत, अशी स्थिती आहेत. यासंबंधी रशियाचे प्रशासनही काही करु शकत नाही, असे दिसून येत आहे.