For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सणासुदीच्या श्रावणसरीत डाळीचे दर वधारले !

12:20 PM Aug 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
सणासुदीच्या श्रावणसरीत डाळीचे दर वधारले
pulses
Advertisement

कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर , दोडका तेजीत

गडहिंग्लज प्रतिनिधी

श्रावणातील धार्मिक आणि घरगुती कार्यक्रमाची रेलचेल वाढली आहे. चौथ्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजच्या आठवडी बाजारात मात्र हरभरा, तूर, मसूर आणि मूग डळीचे दर वधारल्याचे दिसून आले. सणासुदीत खाद्यतेलासह रवा, साखर, गुळाच्या किंमतीत किंचीत वाढ झाल्याने गृहिणीचे घरगुती बजेट कोलमडले आहे. संततधारेने बाजारात अपेक्षेप्रमाणे उलाढाल दिसत नव्हती.

Advertisement

श्रावणामध्ये धार्मिक कार्यक्रम होत असल्याने घरात उपवासाच्या साहित्याला मागणी असते. उत्सवात कांदा, बटाटा, रवा, साखर, मैदा, गूळ, डाळीचा वापर अधिक होत असतो. भाजीपाल्याचा देखील वापर होत असल्याने बाजारात मागणी मोठी असते. पण गेले काही दिवस पुन्हा सुरू झालेल्या पावसाने भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.

किराणा दुकानात साखर 41-42 ऊपये प्रती किलो, मोठा रवा 40 ऊपये प्रती किलो, गूळ 47-48 ऊपये प्रती किलो, पोहे 48-50 ऊपये प्रती किलो, मुगडाळ 110-120 ऊपये प्रती किलो, तूरडाळ 170-180 ऊपये प्रती किलो, मसूरडाळ 95-100 ऊपये प्रती किलो, हरभरा डाळ 100 ऊपये प्रती किलो, मैदा 35-40 ऊपये प्रती किलो, पिवळा मसूर 175-180 ऊपये प्रती किलो दराने किरकोळ विक्री होत आहे.
भाजी मंडईत टोमॅटो 25-30 ऊपये प्रती किलो, गवार 90-100 रूपये प्रती किलो, बिन्स 80-90 ऊपये प्रती किलो, भेंडी, वांगी, काकडी, गाजर, कारले 60-70 रूपये प्रती किलो, कांदा 40-50 प्रती किलो, बटाटा 50 रूपये प्रती किलो, सिमला मिरची 70-80 ऊपये प्रती किलो, हिरवा वाटण 150-160 रूपये प्रती किलो, कोबी 25-30 ऊपये प्रती नग, दोडका 50-60 ऊपये किलो, फ्लॉवर 30-40 प्रती नग दराने विक्री सुरू होती. 15 दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारपासून पुन्हा हजेरी लावली आहे. आठवडी बाजारादिवशी दिवसभर पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम खरेदी-विक्रीवर दिसून आला. किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांना पावसाने मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले.

Advertisement

लसणाची फोडणी महागली
बाजारात कर्नाटक आणि उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या लसणाने उच्चांकी दर गाठला आहे. बाजारात किरकोळ 380-400 ऊपये प्रती किलो लसणाची विक्री सुरू होती. त्यामुळे सणासुदीत लसणाची फोडणी वाढणार असून पावसाळा आणि थंडीच्या दिवसात लसणाची मागणी अधिक होत असल्याचे सांगण्यात आले.

बाजारात गणेशोत्सवाची चाहुल
अगदी मोजक्या दिवसावर लाडका गणेशोत्सव आल्याने गडहिंग्लजच्या आठवडी बाजारात गणेशोत्सव साहित्याची चाहुल दिसून आली. अनेक ठिकाणी घरगुती सजावटीचे साहित्य विक्रीसाठी स्टॉलमधून ठेवले आहे. महिन्याअखेर असल्याने नोकरदार आणि रोजदारी वर्गात उत्साह असला तरी पावसाने बाजारात शांतता दिसून आली.

Advertisement
Tags :

.