बाजारात खाद्यतेलाचे दर भडकले
डब्यामागे 300 ते 350 रुपयांची वाढ
बेळगाव : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या तेलाच्या दराचा चटका सहन करावा लागत आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाचे दर डब्यामागे 300 ते 350 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांत ही दरवाढ झाली आहे. आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यातच वाढत्या तेलाच्या दराने जगणे मुश्कील होऊ लागले आहे. धान्य, डाळी, पालेभाज्या त्याचबरोबर आता खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल, रिफाईंड तेलावरील आयात शुल्कात 20 टक्के वाढ झाल्याने अचानक तेलाचे भाव वाढले आहेत.
त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर लहान व्यावसायिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे. सणातच खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने फोडणीबरोबरच फराळांच्या पदाथर्विंरही परिणाम होऊ लागला आहे. किरकोळ बाजारात तेलाचे भाव किलोमागे 20 रुपयांनी वाढले आहेत. शंभर रुपये किलो मिळणारे खाद्यतेल आता 120 रुपयांवर पोहोचले आहे. 1650 रुपये असणारा सोयाबीन तेलाचा डबा 1950 रुपयांवर गेला आहे. तर रिफाइर्डिं तेल डबा 1700 रुपयांवरून 2150 रुपयांवर पोहोचला आहे. पंधरा किलो डब्यामागे 300 ते 350 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय दिवाळी जवळ येत असल्याने फराळाची मागणी अधिक असते. मात्र, तेलदरात वाढ झाल्याने पदार्थ तयार करणाऱ्यांसमोर चिंता वाढली आहे.