For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रपतींकडूनही डीपफेकसंबंधी चिंता व्यक्त

06:31 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रपतींकडूनही डीपफेकसंबंधी चिंता व्यक्त
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही डीपफेकसंबंधी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करुन निर्माण केलेल्या बेकायदेशीर आणि अवैध व्हिडीओंमुळे मोठा गोंधळ निर्माण होत असून अनेकांचे व्यावसायिक आणि सामाजिक भवितव्य धोक्यात येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात शनिवारी बोलत होत्या.

अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या क्रांतीकारक परिवर्तनासंबंधी भारतातील पोलिसांना सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी पोलिसांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. कारण, या तंत्रज्ञानाचे जसे लाभ आहेत, तसा दुरुपयोगही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलिसांना याची माहिती करुन देणे अनिवार्य ठरणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांनीही याची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

कायदा-सुव्यवस्था सुदृढ हवी

देशाची आर्थिक प्रगती व्हावयाची असेल तर देशात विदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान येण्याची आवश्यकता आहे. ज्या देशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे नसते, तेथे अशी गुंतवणूक येत नाही. परिणामी असे देश आर्थिक विकासात मागे राहतात. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा-सुव्यवस्था सुयोग्य राखण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.