वस्तूतल्या ईश्वराच्या उपस्थितीमुळेच वस्तू वैशिष्ट्यापूर्ण होते
भगवंत म्हणाले, मी निर्माण केलेल्या मायेच्या सहाय्याने विश्वात अनेक प्राण्यांची निर्मिती भव्य प्रमाणात होत असते परंतु माझ्यादृष्टीने प्रत्येकाचे महत्त्व सारखेच आहे. ह्या सगळ्यात मी केंद्रस्थानी असल्याने माझ्याहून वेगळे असे काहीच नाही. सोन्याच्या तारेमध्ये सोन्याचे मणी ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे. ही गुंफण एव्हढी मजबूत आहे की, त्यामधील घटकांना इकडेतिकडे हलायला मुळीच वाव नाही. मी व विश्व वेगवेगळे दिसत असलो तरी ह्या विश्वातला जीवनरस माझ्यामुळेच अस्तित्वात आलेला आहे. प्रत्येक वस्तुचे, व्यक्तीचे एक वैशिष्ठ्या असते आणि त्यामुळे त्या वस्तूचे, व्यक्तीचे अस्तित्व ठळकपणे उठून दिसते. त्या वस्तूत असलेल्या माझ्या उपस्थितीमुळेच त्या पदार्थाला ते वैशिष्ठ्या प्राप्त झालेले असते.
पाण्यामध्ये ओलावा किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र-सूर्यामधील तेज मीच आहे असे समज. पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावत:च असणारा शुद्ध वास मीच आहे, आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदातील ओंकार मी आहे. मनुष्याच्या ठिकाणी अहंपणाचे जे सारभूत पौरुषत्व म्हणजे मी हे करू शकतो ह्या आत्मविश्वासामुळे जो पराक्रम त्याच्या हातून घडतो तो पराक्रम मी आहे.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, पृथ्वीमधील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे. प्राणिमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे. तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे पांघरुण आहे ते दूर केल्यावर जे तेज उरते, ते मी आहे.
मी पुण्य-गंध पृथ्वीत असे अग्नीत उष्णता । प्राणि-मात्रात आयुष्य तपो-वृद्धांत मी तप ।। 9 ।।
सर्व भूतांत जे बीज ते मी जाण
सनातन । बुद्धिमंतांत मी बुद्धि तेजस्व्यांत हि तेज मी ।। 10।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत इतर पदार्थांची वैशिष्ठ्यो आणि त्यातील त्यांची उपस्थितीचे स्वरूप ह्याबद्दल पुढे सांगत आहेत. ते म्हणाले, अग्नीत असलेल्या उष्णतेचे वैशिष्ट्या मी आहे. त्रैलोक्यामध्ये नानाप्रकारच्या योनीत उत्पन्न होणारे प्राणी त्यांच्या शरीराला सोसेल असा आहार घेतात. कुणी वारा पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात. त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच असतो.
म्हणून जेवायला सुरवात करण्यापूर्वी अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे लक्षात येण्यासाठी श्रीहरिचे स्मरण करावे. जेवणे म्हणजे केवळ पोट भरणे नसून पोटात वैश्र्वानर अग्नीच्या रुपात उपस्थित असलेल्या भगवंतांना आहुती दिल्यासारखे आहे. श्रीहरिच्या स्मरणाने तो यज्ञ आपल्या हातून आपोआपच होत असतो.
पुढे भगवंत म्हणाले, विश्वाच्या निर्मितीपासून त्याच्या लयापर्यंत सर्व वस्तूंच्या ठिकाणी असलेले आत्मतत्व मीच आहे. बुद्धिमानांची बुद्धि व तेजस्व्यांचे तेज मी आहे. जेव्हा तू ह्या सगळ्यावर विचार करशील, तेव्हा तुला ह्याचा चांगला उपयोग होईल. तपस्वी लोकांचे ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज.
क्रमश: