मान्सूनपूर्वच्या तडाख्याने कोकणची आर्थिक घडी विस्कटली
मोसमी पावसाने नेहमीच्या वेळेपेक्षा दोन आठवडे आधीच कोकणात हजेरी लावली आहे. तळकोकणात सरासरी 7 जून रोजी दाखल होणारा मोसमी पाऊस यंदा 25 मे रोजीच दाखल झालाय. पण, त्या अगोदरपासूनच आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अक्षरश: झोडपून काढले. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची यात पुरती तारांबळ उडाली. मे महिन्याच्या मध्यानंतर सलग दहा दिवस कोसळणाऱ्या पावसाने कोकणातील मासेमारी, पर्यटन, शेती, आंबा-काजू बागायती या प्रमुख चार व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. कोकणची आर्थिक घडी विस्कटली आहे.
शेती, आंबा-काजू बागायतींबरोबरच मासेमारी आणि पर्यटन हे कोकणातील दोन प्रमुख व्यवसाय आहेत. पर्यटन हा तर गेल्या काही वर्षांमध्ये कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनत चालला आहे. मे महिना कोकणातील पर्यटन व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत सुगीचा कालावधी असतो. या कालावधीत दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत असतात. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. यावर्षीसुद्धा मे अखेरीस हेच चित्र पहावयास मिळाले असते. परंतु 19 मेपासून वादळी वाऱ्यांसह सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पर्यटनाचे सारे गणितच बिघडवून टाकले.
एरव्ही 26 मेपासून बंद होणारी सागरी प्रवासी जलवाहतूक खराब हवामानामुळे 20 तारखेलाच बंद करावी लागली. याचा मोठा आर्थिक फटका कोकणातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, वॉटरस्पोर्टस्, बोटींग व्यावसायिकांना बसला. साहसी जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी कोकणात जाण्याचा बेत हजारो पर्यटकांनी पावसामुळे रद्द केला. त्यामुळे कोकणात होऊ शकणारी कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यंदाच्या पर्यटन हंगामात मालवणातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी 5 लाख 15 हजार 806 पर्यटकांनी हजेरी लावली. 25 मेपर्यंत हा हंगाम चालला असता तर यात अजून किमान 50 हजार पर्यटकांची भर पडली असती. पण हवामान बदलामुळे सागरी जलपर्यटनाला अखेरच्या टप्प्यातील अधिकचे उत्पन्न गमवावे लागले. हवामान बदलाचा परिणाम मत्स्य व्यवसायारवही झाला.
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवसांचा असतो. परंतु वादळी हवामानामुळे यंदा हंगाम समाप्ती अगोदरच मच्छीमारांची आवराआवर सुरू आहे. सागरी मासेमारीसुद्धा 20 मेपासून बंद आहे. आता उरलेल्या अवघ्या काही दिवसांसाठी मोठ्या संख्येने नौका मासेमारीसाठी समुद्रात उतरतील, याची शक्यता कमीच आहे. कोकणातील अनेक आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित हे आंब्याच्या शेवटच्या हंगामातील दरांवर अवलंबून असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या अर्थव्यवस्थेत आंबा उत्पादनाचे महत्त्व मोठे आहे. परंतु मे महिन्याच्या मध्यावरच आलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचेही आर्थिक गणित बिघडले आहे. पर्यटकांची संख्या रोडावल्याने अंतिम टप्प्यातील आंबा खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे. पावसाला कंटाळून बहुतांश चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यंदाच्या उन्हाळी सुट्टीचा मनसोक्त आनंद त्यांना घेता आलेला नाही. मुसळधार पावसामुळे गावी आलेल्या चाकरमान्यांच्या उत्साहावरही विरजण पडले.
अनुकूल वातावरणामुळे सध्या मोसमी पावसाची प्रगती वेगाने सुरू आहे. सरासरी तारखेपेक्षा 12 दिवस अगोदरच मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला आहे. परंतु त्या अगोदर झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातील शेतमळे पाण्याने भरले आहेत. सततच्या पावसामुळे शेत शिवारात चिखल झाल्यामुळे खरीप हंगामाच्या मशागतीचा खोळंबा झाला आहे. पेरण्यांनाही विलंब होणार आहे. सर्वसाधारपणे रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर कोकणातील शेतकरी पेरणीला प्रारंभ करतात. रोहिणी नक्षत्रास 25 मे रोजी प्रारंभ झालाय. पण याचदिवशी रात्री सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मोसमी पावसाचे आगमन झाले आहे आणि त्या अगोदर 20 मेपासून मान्सूनपूर्व पाऊस कोसळलाय. लागवडीपूर्वीच बहुतांशी भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करणेदेखील कठीण होऊन बसले आहे. यावर पर्याय म्हणून कृषी विभागाने भात रोपासाठी चटई पद्धतीची संकल्पना मांडली आहे. या पद्धतीतून 12 ते 15 दिवसात भात रोपे तयार होऊन ती लागवडीयोग्य होतात. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.
मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेची धावपळ उडाली आहे. परीक्षेची फारशी तयारी केली नसताना एखादा अवघड पेपर हाती आल्यानंतर जशी परीक्षार्थींची अवस्था होते, तशीच काहीशी परिस्थिती आपत्कालीन यंत्रणेची यावेळी झाली. काही तालुक्यांमधील पावसाळी आपत्कालीन व्यवस्थापन बैठकासुद्धा झाल्या नव्हत्या. अशावेळी पावसाने हजेरी लावत ‘आपत्कालीन’ व्यवस्थापनची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी 23 मे रोजी चिपळुणात आढावा बैठक घेतली. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी 24 मे रोजी सिंधुदुर्गनगरीत बैठक घेऊन सर्व संबंधित विभागांना सतर्कतेच्या सूचना केल्या.
मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा जवळपास 4 दिवस कोलमडली होती. अनेक घरे अंधारात होती. वीज महावितरणचे अधिकारी व कर्मचारीवर्गाने उपलब्ध साधनसामग्रीच्या जोरावर लोकांचा अंधार दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. या दरम्यान त्यांना राजकीय मंडळींकडून नेहमीप्रमाणे धारेवरही धरले गेले. परंतु, वीज महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ आणि साधनसामग्री आहे का, याचाही विचार कधीतरी झाला पाहिजे. वीजवाहिन्यांना अडचणीची ठरणारी झाडे तोडण्यासही बऱ्याचदा स्थानिकांकडून अटकाव केला जातो. त्याचाही परिणाम वीज पुरवठ्यावर होत असतो, याकडेदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही. कोकण किनारपट्टीवर मागील 20 वर्षात चक्रीवादळांची संख्या वाढली आहे. हवामान बदलाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर सातत्याने जाणवतोय. अधूनमधून होणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. यावर उपाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भूमिगत वीज वाहिनीचे काम कधी पूर्ण होणार, हा सवाल यानिमित्तानं पुन्हा उपस्थित होऊ लागला आहे.
हवामान विभागाने मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यानंतर दाखल झालेल्या मान्सूनच्या आगमनाबद्दल वेळोवेळी अंदाज वर्तवला होता. परंतु हा पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात सलग कोसळत राहील, असे कुणालाच स्वप्नातही वाटले नव्हते. अगदी प्रशासकीय यंत्रणेलाही याचा अंदाज आला नाही, असेच म्हणावे लागेल. कारण आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित पावसाळ्यापूर्वीची काही शासकीय कामे अद्याप प्रलंबित आहेत. गटार खोदाई आणि रस्त्यांच्या साईडपट्टीची कामे भर पावसात सुरू असल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी रस्त्यांच्या खोदाईंमुळे चिखलाचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी पुराची आपत्ती टाळण्यासाठी नदीपात्रातून उपसलेला गाळ नदीकिनारीच पडून आहे. तो पुन्हा नदीपात्रात गेल्यास गाळ उपशासाठी केलेला खर्च वाया जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा ते संगमेश्वर दरम्यानचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामाला पावसाचा फटका बसला आहे. रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या-नागपूर महामार्गावरील एक मोरीसुद्धा पहिल्याच पावसात खचली. महामार्गाच्या खोळंबलेल्या कामांचा येथील प्रवासीवर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. कोकणात पाऊस असाच सुरु राहिल्यास आपत्कालीन यंत्रणेचे टेन्शन आणखी वाढणार आहे.
महेंद्र पराडकर