महिलांच्या नाकाचे छिद्र बंद करण्याची प्रथा
चेहऱ्यावर टॅटू काढल्यावरच होतो विवाह
अरुणाचल प्रदेशातील हिरवाईने नटलेले खोरे आणि तेथे वसलेले अनेक आदिवासी समुदाय स्वत:च्या वेगळ्या परंपरा आणि जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. याचपैकी अपातानी समुदाय असून तो स्वत:ची विशेष संस्कृती आणि खासकरून महिलांशी निगडित परंपरांकरता नेहमीच चर्चेत असतो. या समुदायाच्या महिला कधी चेहऱ्यावर काढण्यात आलेला टॅटू आणि नाकात लावण्यात आलेल्या मोठ्या लाकडी नोज-प्लगमुळे ओळखल्या जात होत्या. ही परंपरा केवळ सजावट म्हणून नव्हती, तर यामागे खोल सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे लपलेली होती.
महिलांचे व्हायचे अपहरण
जुन्या कहाण्यांनुसार अपातानी महिला अत्यंत सुंदर मानल्या जायच्या. त्यांच्या सौंदर्याची मोठी ख्याती असल्याने अन्य समुदाय अनेकदा त्यांचे अपहरण करत होते. परिवारांनी या धोक्याला सामोरे जाण्यासाठी विचित्र उपाय शोधला. त्यांनी मुलींच्या चेहऱ्यावर दाट निळ्या रंगाचे टॅटू काढण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांचे आकर्षण कमी होईल आणि त्या सुरक्षित राहतील.
लोककथा प्रख्यात
याचबरोबर या प्रथेशी निगडित आणखी एक लोककथा आहे. समुदायाचे पुरुष जेव्हा युद्धात मारले जातात, तेव्हा त्यांचे आत्मे घरी परत येतात. हे आत्मे स्वत:च्या पत्नींना ओळखू शकत नाहीत आणि त्यांना त्रास देतात. अशास्थितीत समुदायाच्या पुजाऱ्यांनी महिलांना स्वत:च्या चेहऱ्यांवर टॅटू काढण्याचा सल्ला दिला. टॅटूमुळे आत्मा त्यांना ओळखू शकतील, असे मानले जात होते. हळूहळू ही परंपरा समाजात खोलवर स्थापित झाली.
चेहऱ्यावर टॅटू
टॅटू काढून घेण्याची प्रक्रियाही खास होती. मुली 10 वर्षे वयाच्या झाल्यावर हा विधी पूर्ण केला जायचा. त्यांच्या माथ्यापासून नाकापर्यंत एक मोठी सरळ रेषा आणि हनुवटीवर 5 थेट रेषा गोंदवून घेतल्या जायच्या. या प्रव्र्रियेसाठी टोकदार सुयांचा वापर व्हायचा. टॅटूची शाई डुकराची चरबी आणि कोळसा मिसळून तयार केली जायची. तर नाकात लावण्यात येणारे मोठे लाकडी प्लग ज्यांना ‘यापिंग हुरलो’ म्हटले जाते, ते जंगलातील खास लाकडाद्वारे तयार केले जायचे.
नोज प्लगशिवाय विवाह नाही
प्रारंभी ही परंपरा महिलांना कमी आकर्षक करण्यासाठी सुरू झाली होती, परंतु काळासोबत याचा अर्थ बदलला. चेहऱ्यावर टॅटू आणि नोज-प्लग आता गर्व, सुंदरता आणि ओळखीचा प्रतीक ठरला. याचबरोबर महिलेच्या चेहऱ्यावर टॅटू आणि नोज प्लग नसेल तर तिला विवाहयोग्य मानले जात नव्हते. समुदायाची ही प्रथा महिलांचे सौंदर्य आणि समृद्धी दाखवू लागली.
सरकारकडून बंदी
काळासोबत आधुनिकतेने समुदायाच्या युवांच्या मानसिकतेला प्रभावित केले आहे. टॅटू आणि नोज-प्लग आपल्याला उर्वरित जगापासून वेगळे पाडतात, असे त्यांना वाटू लागले. ते याला स्वत:चे स्वातंत्र्य आणि ओळखीवर भार मानू लागले. 1970 च्या दशकात अपातानी यूथ असोसिएशन आणि सरकारच्या प्रयत्नांद्वारे या परंपरेवर बंदी घालण्यात आली. हळूहळु ही प्रथा समाप्त झाली अणि आता केवळ इतिहासाचा हिस्सा ठरली आहे.