For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेन झी’ मध्ये विधायक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद

06:37 AM Jun 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
जेन झी’ मध्ये विधायक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद
Advertisement

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ‘जेन-झी’चा बोलबाला आहे ‘जेन-झी’ म्हणजे 1997 ते 2012 या काळात जन्माला आलेली पिढी. या पिढीने मोठं होताना अनेक स्थित्यंतरं अनुभवली, असंख्य बदल पचवले. एका बाजूला टीव्ही-रेडिओपासून ते डिजिटल अवकाशामध्ये स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या  या पिढीने, ‘कोरोना’सारख्या महामारीचा आणि त्यातून निर्माण झालेल्या बदलांचा सुद्धा सामना केला.

Advertisement

आज याच पिढीतील बहुतेक लोक तिशीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे बदलत्या जगाबरोबरच, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा या पिढीच्या खांद्यावर येत आहेत. आजची तरुण पिढी सर्वात वेगळी आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर ही तरुण पिढी दोन तासांचे काम अवघ्या अर्ध्या तासात करू शकते. गेल्या काही दिवसांपासून ‘जेन-झी’ ही संज्ञा अचानक चर्चेत आली आणि पाहता पाहता एका मोठ्या समूहाच्या मानसशास्त्रावर तिचा प्रभाव पडला. तशी पाहिल्यास, ही संज्ञा 1997 ते 2012 या वर्षांदरम्यान जन्मलेल्या पिढीसाठी वापरली जाते. महत्त्वाचा प्रश्न हा नाही की या पिढीकडे कसे पाहिले जाते? ही संज्ञा दीर्घकाळ टिकेल की अल्पकाळ? ‘जेन-झी’ हा कृत्रिमरित्या तयार केलेला शब्द आहे की आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारा स्वाभाविक शब्द आहे? तर मग, ही पिढी सर्जनशील आहे? विचारवंत आहे, दूरदृष्टीची आहे की केवळ क्रांतीकारक? हिचा उद्देश केवळ व्यवस्था बदल आहे की एका नव्या युगाची निर्मिती?. त्यामुळेच या जेन झीमध्ये नेमकं वेगळं असं काय आहे? याचा शोध सध्यातरी, मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे.

कोणत्या वयोगटाला काय नाव आहे?

Advertisement

ग्रेटेस्ट जनरेशन-ग्रेटेस्ट जनरेशनमध्ये 1901 ते 1927 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.

सायलेंट जनरेशन-सायलेंट जनरेशनमध्ये 1928 ते 1945 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.

बेबी बूमर्स-बेबी बूमर्स पिढीमध्ये 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.

जनरेशन एक्स-जनरेशन एक्स पिढीमध्ये 1965 ते 1980 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.

मिलेनिअल्स किंवा जनरेशन वाय- मिलेनिअल्स पिढीमध्ये 1981-1996 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.

जेन झी-जेन झी पिढीमध्ये 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.

जनरेशन अल्फा-जनरेशन अल्फा या पिढीमध्ये 2013 ते 2024 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.

जनरेशन बीटा-जनरेशन बीटा या पिढीमध्ये 2025-2039 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे. साधारणपणे 1997 ते 2012 या काळात जन्मलेली लोकं ही जेन झी म्हणून ओळखली जातात. 1997 मध्ये जन्मलेला हा तरुण आता 28 वर्षाचा आहे. तर 2012 मध्ये जन्मलेला हा तरुणवर्ग आता 15 वर्षाचा आहे. म्हणजे वय वर्ष 15 ते 28 या वयोगटातील तरुण, तरुणीला ‘जेन झी’ पिढी म्हणून ओळखले जाते. काही ठिकाणी 1995-2010 असा कालावधीही सांगितला जातो.

आज पन्नाशीच्या पुढे असलेली पिढी ही मैदानी खेळ, एकत्र कुटुंब, सार्वजनिक गणपतीमधील सांस्कृतिक कार्यक्रम, आजोळ यावर वाढलेली आहे. त्यामुळे या पिढीची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. अॅडजस्ट करण्याची सवय लागलेली आहे. व्यवस्थेला शरण जाण्याची वृत्ती आहे. याउलट जेन झी ही पिढी लहानपणापासून इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडियाशी जोडलेली पिढी आहे. भ्रष्टाचाराबद्दल राग आहे. आपली फसवणूक होते आहे याची जाणीव आहे. ती कदाचित घरातील मोठ्या व्यक्तीशी व्यक्त होत नसतील पण ती अस्वस्थ आहे. या पिढीला माहिती, मनोरंजन आणि शिक्षणासाठी डिजिटल साधनांचा वापर नैसर्गिक वाटतो. सामाजिक बदल, पर्यावरण, विविधता यांसारख्या विषयांबद्दल ही मंडळी जागरूक असतात. रिळ, मीम्स, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट,

टिकटॉक यासारख्या प्लॅटफॉर्मवर जास्त सक्रिय असतात. अनेक तरुणांचा फोकस क्लिअर असतो. करिअरमध्ये वर्कलाईफ बॅलन्स आणि फ्लेक्सिबिलिटीला प्राधान्य. म्हणजेच जेन झी ही ‘डिजिटल नेटिव्ह’ पिढी आहे. आपण सरसकट असे समजतो की या तरुण पिढीला कशाचं काय पडलेले नाही. जगभर तरुण पिढी पर्यावरण, सामाजिक बदल या कामात सक्रिय असतात. स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ती वयाच्या सोळाव्या वर्षी तिने हवामान बदलाच्या संदर्भात स्वीडिश संसदेसमोर आंदोलन केले. ‘हाऊ डेअर यू’? असं म्हणत ‘ग्लोबल वॉर्मिग’ कडे संपूर्ण जगाचे लक्ष वळविले होते. ग्रेटाप्रमाणे भारतातील या तरुण पिढीला सामाजिक आणि सांस्कृतिक भान आहे. पर्यावरण, लिंगसमानता, मानसिक आरोग्य, सामाजिक न्याय याबाबत ही पिढी अधिक जागरूक आहे.

प्रा. डॉ. गिरीश नाईक

Advertisement
Tags :

.