स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ताही लाडक्या बहिणीच देतील
कोल्हापूर :
लाडकी बहीण योजनेचा किती मोठा फटका बसला हे सतेज पाटील यांना माहित आहे. विकासकामांना कात्री लावू पण ही योजना बंद करणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देणार, म्हणजे सर्व सत्ता लाडक्या बहिणीच महायुतीला देतील, असे सांगत बंटी पाटलांनी कळ काढल्यामुळेच बोलावं लागलं असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
गोकुळचे संस्थापक स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित नूतन मंत्री, खासदार यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात नेत्यांमध्ये राजकीय टोलेबाजी रंगली. चेअरमन अरुण डोंगळे यांनी त्यांच्या भाषणात लाडक्या बहिणींचा उल्लेख केला. यावेळी उपस्थितांमधून आमदार सतेज पाटीलही व्यासपीठावर असल्याचा आवाज दिला. यानंतर चेअरमन डोंगळे यांनी त्यांनीही 3 हजार जाहीर केले, पण उशिरा जाहीर केल्यामुळे लोकांनी फार मनावर घेतल नाही, असे वक्तव्य केल्यानंतर एकच हशा पिकला. यानंतर आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या भाषणात मंत्री मुश्रीफ यांच्याकडे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी द्यायचे ते द्या पण कमी करु नका अशी मागणी करत डिवचले. यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी लाडकी बहिण योजनेचा किती मोठा फटका बसला हे बंटी पाटील यांना माहित आहे, असा उपहासात्मक टोला लगावला.
- गोकुळमुळे जाहीरपणे अभिनंदनाची संधी
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर शाहू छत्रपती यांचे जाहीरपणे अभिनंदन करण्याची इच्छा होती. पण महायुतीचा आमदार असल्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही प्रचार केला. त्यामुळे त्यांचे जाहीरपणे अभिनंदन करता आले नाही. मात्र गोकुळमुळे जाहीर अभिनंदनाची संधी मिळाल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
- त्यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही धुरा येईल
मंत्री मुश्रीफ त्यांच्या भाषणाला सुरुवात करत असताना मान्यवरांच्या नावांचा उल्लेख करत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील असे नाव घेत असताना लवकरच त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचीही धुरा येईल असे वक्तव्य केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
- परदेश दौऱ्यावर न जाता चेअरमन येथे का थांबणार?
एकीकडे गोकूळचे सर्व संचालक अभ्यास दौऱ्यासाठी जात असताना चेअरमन डोंगळे कोल्हापूरात का थांबत आहेत. कदाचित विधान परिषदेच्या यादीचा निकाल लागल्यामुळे पुढील जुळण्या लावण्यासाठी ते थांबत असावेत, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच मंत्री मुश्रीफ यांनीही संचालक परदेश दौऱ्यावर जात असताना चेअरमन येथे का थांबत आहेत हे समजलं नसल्याचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला.
- कागलचा बॅकलॉग भरला हे जाहीर करा
मंत्री मुश्रीफ आयुर्वेदीक, होमिओपॅथी आणि योगा कॉलेज कागल मतदारसंघात सुरु करत आहेत. त्यांनी आता कागलचा बॅकलॉग भरला असे जाहीर करत डेंटल कॉलेज तरी कोल्हापूरमध्ये सुरु करावे, शेंडापार्क मध्ये जागा आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. त्याला तिथे आयटी पार्क करायचे आहे असे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले.
- राज्याच आरोग्य कोल्हापूरच्या हातात, मेडिकल हब बनवा
वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य हि दोन्ही खाती कोल्हापूरला मिळाली आहेत. त्यामुळे राज्याच आरोग्य कोल्हापुरच्या हातामध्ये आले असून मुंबईप्रमाणे कोल्हापुरलाही मेडिकल हब बनविण्यासाठी दोन्ही मंत्र्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वच नेत्यांनी त्यांच्या भाषणात केली. आमदार सतेज पाटील यांनी मेडिकल टूरिझमच्या माध्यमातून कोल्हापुरला वैद्यकीय क्षेत्रात पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. खासदार शाहू छत्रपती यांनीही स्व. दिग्विजय खानविलकर यांच्यानंतर आज पुन्हा कोल्हापूरला आरोग्य मंत्रीपद मिळाले आहे. दोन्ही मंत्र्यांना कोल्हापूरच्या वैद्यकीय प्रगतीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. यावर मंत्री मुश्रीफ, मंत्री आबिटकर यांनी कोल्हापुरला वैद्यकीय क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले.