माणसं जोडण्याची ताकद मराठी भाषेत !
अच्युत सावंत भोसले यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत कोमसापतर्फे मराठी भाषा दिन उत्साहात
सावंतवाडी : प्रतिनिधी
माणसं जोडण्याची ताकद मराठी भाषेत आहे. देश-विदेशात गेल्यावर भाषेतील शक्तीचा अनुभव येतो. मुलं जन्माला आल्यावर आई अशी हाक मारतं, ती शक्ती आपल्या मायबोलीत आहे. सीबीएससी पद्धतीत शिक्षण देताना माय मराठीसह इतर भाषा जपण्याचं काम आम्ही करत आहोत असे प्रतिपादन भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी केले. सावंतवाडी येथील कोमसाप शाखा सावंतवाडी आयोजित 'मराठी भाषा गौरव दिवस' कार्यक्रमात ते बोलत होते.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या माध्यमातून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच भोसले इंटरनॅशनल स्कुल येथील विद्यार्थ्यांच्या समवेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला.
यानिमित्ताने चिमुकल्यांच्या उपस्थित प्रशालेच्या परिसरात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मी मराठी, माझी मराठी..., अभिजात भाषा, मराठी भाषा...अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत बहिणाबाई आदींसह संत, मराठीसाठी योगदान दिलेल्या साहित्यिकांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, साहित्यिक दादा मडकईकर, कोमसाप अध्यक्ष अँड संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, अँड. नकुल पार्सेकर, रामदास पारकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, दीपक पटेकर, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस, प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई, नितीन सांडये, संजय सावंत, साबाजी परब, प्राची कुडतरकर, संपदा राऊळ, ऋतुजा तुळसकर, श्रीराम साईल आदि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र गीतांनं कार्यक्रमास प्रारंभ झाला. मराठी भाषा दिनी जयंती निमित्त कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मालवणी कवी दादा मडकईकर व शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे अच्युत सावंत भोसले यांचा कोमसापच्यावतीनं सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री. भोसले म्हणाले, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर साहित्यिक मंडळींच्या उपस्थितीत मराठी भाषेचा गौरव करण्याच भाग्य आमच्या प्रशाळेला लाभलं. मातृभाषा जपण्याचं काम आम्ही करत आहोत. सीबीएससी पद्धतीत शिक्षण देताना मराठीसह इतर भाषांचेही संस्कार विद्यार्थ्यांवर करत आहोत. मराठी भाषेतील शक्तीची ओळख मुलांना करून देत आहोत असे प्रतिपादन त्यांनी केले.
समारोपप्रसंगी कोमसाप तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेकांनी लढा दिला. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचंही मोठ योगदान त्यात आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळताना मराठी भाषा मंत्री हे सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर होते. आपली भाषा जपली जावी यासाठी कोमसाप नेहमी तत्पर असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अन् मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थांचा गौरव यापुढे कोमसाप करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सुरुवातीला अँड. नकुल पार्सेकर यांनी कविवर्य कुसुमाग्रज व मराठी भाषा गौरव दिवस यावर मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक, कवी दादा मडकईकर यांचा खास चिमुकल्यांसाठी व ज्येष्ठांना बालपणात घेऊन जाणारा "आठवणीतील जुन्या कविता'' हा कार्यक्रम पार पडला. जुन्या अन् लयबद्ध चालीतून दादांनी केलेल्या अप्रतिम सादरीकरणानं कार्यक्रमास अधिक रंगत आली. यातील उठा उठा चिऊताई, कुजबूज रे, पर्वतांनो दूर व्हारे आदी जुन्या कविता खास ठरल्या. रामदास पारकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषेतील गोडी सांगणारा कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव राजू तावडे यांनी सादर केले. सुत्रसंचालन दीपक पटेकर तर आभार उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी मानले.