सरकारची ‘टेस्ला’ला मान्यता मिळण्याची शक्यता
ईव्ही उत्पादनाच्या आगामी टप्प्यात संदर्भात पीएम कार्यालयात बैठक
नवी दिल्ली :
जागतिक पातळीवरील दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी ‘टेस्ला’ला भारतात उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी सरकार जानेवारी 2024 पर्यंत सर्व आवश्यक ती मंजुरी देऊ शकते. यासाठी शासकीय विभाग वेगाने काम करत असल्याची माहिती एका अहवालात समोर आली आहे.
पंतप्रधान कार्यालयात सोमवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये टेस्लाच्या गुंतवणूक प्रस्तावासह देशातील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या आगामी टप्प्यावर चर्चा करण्यात आली.
सर्वसाधारण धोरणात्मक विषयांवर बैठक
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी पंतप्रधान कार्यालयात झालेली बैठक प्रामुख्याने सामान्य धोरणात्मक बाबींवर होती, परंतु जानेवारी 2024 पर्यंत देशात टेस्लाच्या प्रस्तावित गुंतवणुकीसाठी जलदगतीने मान्यता देणे हा प्रमुख अजेंडा होता.
कार निर्मितीसह बॅटरी कारखाना करणार सुरू
एलॉन मस्कची ईव्ही उत्पादक कंपनी टेस्लाला भारतात इलेक्ट्रिक कारसह बॅटरी स्टोरेज सिस्टीम तयार आणि विकायची आहे. यासाठी कंपनीने भारतीय अधिकाऱ्यंना प्रस्ताव दिला आहे.