पोतदार ज्वेलर्सची लोकप्रियता कायम
पेढीमध्ये पोतदार घराण्याची पाचवी पिढी कार्यरत : ज्वेलर्सवरील विश्वास अतूट : पेढीला भरभराटीचे दिवस
बेळगाव : एखादा व्यवसाय किंवा उद्योग किती वर्षे लोकसेवेमध्ये कार्यरत आहे, यावरून त्याची लोकप्रियता ठरत असते. या निकषावर बेळगावमधील पोतदार ज्वेलर्स पुरेपूर उतरले आहे. 1890 मध्ये सुरू झालेल्या या सुवर्णपेढीने आजही विनम्र सेवा, पारदर्शक व्यवहार व सचोटीच्या बळावर आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. आज या पेढीमध्ये पोतदार घराण्याची पाचवी पिढी कार्यरत आहे. म्हणजेच जवळजवळ पाच पिढ्या या पेढीने ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली आहे.
या सुवर्ण पेढीची मुहूर्तमेढ तम्माजी पोतदार यांनी 1890 मध्ये रोवली गेली 134 वर्षे या पेढीने आपल्या पारदर्शक व्यवहारामुळे लोकांचा विश्वास आणि प्रेमही संपादन केले आहे. तम्माजी पोतदार यांनी सुरू केलेल्या या पेढीची सूत्रे 1920 मध्ये अॅड. भीमाजी बाळाजी पोतदार यांनी सांभाळली. 1930 ते 40 या कालावधीमध्ये त्यांनी या व्यवसायात जम बसवून पेढीचा विस्तार केला. पुढे वेंकटेश तम्माजी पोतदार हे व्यवसायात रुजू झाले. त्यांनी आपल्यासमवेत धाकटे बंधू शामराव यांच्या सहकार्याने पेढीचा अणले.
पेढीला भरभराटीचे दिवस
शामराव यांच्या निधनानंतर वेंकटेश यांनी मोहन या आपल्या मुलाला पेढीमध्ये घेतले. वेंकटेश यांच्या निधनानंतर मोहन यांच्या पाठीवरच्या दोन्ही मुलांनी वामन आणि माधव यांनी ही पेढी सांभाळली. 1980 मध्ये माधव यांचे निधन झाले. त्यानंतर अनिल पोतदार व त्यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ बंधू सुनील, धाकटे बंधू संजय व राजू यांनी पेढीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या अथक प्रयत्नाने, सचोटीपूर्ण व्यवहाराने या पेढीला भरभराटीचे दिवस आले.
घराण्याचे नाव केले उज्ज्वल
सुनील पोतदार यांना या व्यवसायातले अनेक बारकावे तपशीलासह माहीत होते. सोने विषयाशी संबंधित सर्व माहितीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने खरेदीचा व्यवहार कसा चालतो? याची त्यांना उत्तम जाण होती. माणसे जोडण्याची त्यांची कला, त्यांचे बंधू अनिल आणि पुढील पिढ्यांनीसुद्धा आत्मसात केली.
दागिन्यांचे प्रदर्शन भरवण्यास प्रारंभ
सुनील यांच्या निधनानंतर आज त्यांचे सुपुत्र निशिल, अनिल यांचे सुपुत्र मिहीर व संजय यांचे सुपुत्र सर्वेश हे आता व्यवसायात उतरले आहेत. निशिल हे बेळगाव सराफ असोसिएशनचे संचालक असून, त्यांनी अमेरिकेहून जेमेलॉजिस्ट पदवी घेतली आहे. कर्नाटक ज्वेलर्स फेडरेशनचे संचालक पद सांभाळतानाच क्रिकेट कोचिंग इन्स्टिट्यूटचे ते व्यवस्थापकीय संचालक व वेणुग्राम सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. मिहीर हेसुद्धा जेमॉलॉजिस्ट असून त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून मार्केटिंग व फायनान्स विषयात एमबीएची पदवी घेतली आहे. सर्वेश यांनी पेढीमध्येच वेगवेगळ्या दागिन्यांच्या नमुन्यांचे प्रदर्शन भरवण्यास प्रारंभ केला आहे.
बेळगाव व पंचक्रोशीतील ग्राहकांचा त्यांच्यावरील विश्वास अतूट राहिला आहे. पारंपरिक दागिन्यांसाठी तर ग्राहक प्रथम पोतदारमध्येच येतो. काळानुरुप या पेढीने आधुनिक दागिनेसुद्धा उपलब्ध केले आहेत. या पेढीमुळे अनेक सुवर्णकारागिरांना रोजगार मिळाला आहे, हे महत्त्वाचे. खडेबाजार येथील तीन मजली पेढीमध्ये सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची मांडणी पहायला मिळते.