इलेक्ट्रिक वाहनांची वाढणार मिजाज
जागतिक आर्थिक अनिश्चितता असतानाही इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये तेजीचे वातावरण पहायला मिळते आहे. गेल्या काही वर्षात भारतामध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीमध्ये वेगाने वाढ होत असून हा वेग पाहिल्यास आगामी 2030 पर्यंत जगभरातील इलेक्ट्रिक कार्सची विक्री 40 टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकेल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अलीकडच्या ताज्या अहवालामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे. जगासोबत भारतातदेखील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ दिसणार आहे. अहवालानुसार जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक कार्सची विक्री 2025 वर्षअखेर 20 कोटीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ प्रत्येक कार विक्रीपैकी चौथी कार ही इलेक्ट्रिक असणार आहे. इलेक्ट्रिक कारच्या कमी झालेल्या किमती त्याचप्रमाणे पहिल्यापेक्षा अधिक किफायतशीर हे मुद्दे इलेक्ट्रिक कारचा खप वाढण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. जसजशा किंमती कमी होत आहेत तसतशी इलेक्ट्रीक कार्सची मागणीदेखील वाढत आहे. 2024 मध्ये जगभरात 1.7 कोटी पेक्षा अधिक इलेक्ट्रिक कार्सची विक्री झालेली असून जागतिक बाजारातील यांचा वाटा सध्याला 20टक्के इतका दिसून आला आहे. 2025 च्या पहिल्या तिमाहीत इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीत 35 टक्के वाढ झाली आहे. 2019 मध्ये भारतात 680 कार्सची विक्री झाली होती. 2024 मध्ये 1 लाखांपेक्षा जास्त कार्सची विक्री पाहायला मिळाली. भारतासोबत आशिया आणि लॅटिन अमेरिका यासारख्या देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली दिसून येते. 2024 मध्ये पाहता या क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 60 टक्क्यापेक्षा जास्त वधारलेली दिसली आहे. भारतात 680 इलेक्ट्रीक कार्स 2019 मध्ये विक्री झाल्या होत्या. त्या तुलनेत 2024 मध्ये हा आकडा एक लाखावर पोहोचला आहे. यावरुन भारतात इलेक्ट्रीक कार्सप्रती खरेदीदारांचा कल वाढतो आहे, हे स्पष्ट होते. हे पाहता इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये 146 पटीने वृद्धी झाली आहे. 2023 मध्ये पाहता ही संख्या 82 हजार इतकी होती. चालू वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये जवळपास 35हजार इलेक्ट्रिक कारची विक्री झालेली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता भारतातील ही इलेक्ट्रिक कार विक्री 45टक्के अधिक आहे.
2024 मध्ये इलेक्ट्रिक कार्सला लागणाऱ्या
बॅटरीच्या किमती कमी झाल्याने खरेदीदारांचा ओघ याकडे वाढलेला दिसून आला. सोबत बाजारामध्ये कंपन्यांची स्पर्धा झाल्याने आपसूकच इलेक्ट्रिक कार्सच्या किंमती कमी करण्यात आल्या. चीनमध्ये मागच्या वर्षी विक्री करण्यात आलेल्या दोन तृतीयांश इतक्या इलेक्ट्रीक कार्सच्या किंमती या पारंपरिक पेट्रोल, डिझेल इंधनावरील कार्सपेक्षाही कमी होत्या. त्या देशामध्ये या कार्सवर कोणत्याही प्रकारची सरकारी सवलत दिली जात नाही. इंधन आणि देखभालीच्या दृष्टीने पाहता पारंपरिक पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्सपेक्षा इलेक्ट्रिक कार्सना जास्त खर्च येत नाही. त्याचप्रमाणे देखभालीसाठी जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत. समजा कच्च्या तेलाच्या किमती 40 डॉलर प्रति बॅरल इतक्या कमी झाल्या तरीही इलेक्ट्रीक कार्सकरिता खर्च पेट्रोल वाहनांपेक्षा खूप कमी येतो. म्हणूनच इलेक्ट्रिक कार्सप्रती जगासह देशभरातच लोकांची रुची वाढताना दिसत आहे. हा ट्रेंड येत्या काळात अधिक वाढला तर नवल वाटायला नको! असे जरी असले तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ होत असली तरी या कार्स चार्जिंगकरिता लागणाऱ्या चार्जिंग केंद्रांची संख्या आपल्या भारतात खूपच कमी आहे. या चार्जिंग केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे. तसेच वेगाने चार्ज होणाऱ्या केंद्रांची संख्या जास्तीत जास्त वाढायला हवी. शहरे, महामार्ग याठिकाणी सोयीस्कर जागी ही केंद्रे होण्याची गरजही आहे. चार्जिंग केंद्रांमध्ये वाढ झाल्यास येत्या काळात या कार्सना अधिक ग्राहकांची पसंती मिळू शकेल.
-दीपक कश्यप