कांदाटी खोऱ्यात गरिबांना मिळणार हक्काचं घर
सातारा :
गरिबालाच काय पण श्रीमंतालाही वाटत असते, आपले स्वत:चे घर असावे. परंतु श्रीमंतापेक्षा गरिबाला घरं बांधताना खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणून शासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजना ही योजना सुरु केली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून गरिबांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यात मंजूर झालेल्या घराचा पाया खुदाई करताना प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांची उपस्थिती असल्याने घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांना हत्तीचे बळ आले असून घर बांधून पूर्ण करणारच, असा जणू लाभार्थ्यांनी निर्धार केला आहे.
घर बांधून पहावे, विहीर खोदून पहावी, असे म्हटले जाते. त्यानुसार घर बांधायला काढल्यानंतर येणारा खर्च हा गरिबांच्या अवाक्याबाहेर असतो. कमवलेली जमापुंजी तो घरामध्ये खर्च करतो. कर्ज काढतो. तरीही अपेक्षेप्रमाणे घर पूर्ण करु शकत नाही. श्रीमंताबरोबरच गरिबांच्या घराच्या अपेक्षा असतात. त्यानुसार गोरगरिबांना घर बांधण्यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे.
या योजनेतून जिह्यात सुमारे 45 हजार घरकुले मंजूर झाली आहेत. त्यातील मंजूर लाभार्थ्यांच्या घराच्या पाया खुदाईच्या कार्यक्रमाला स्वत: सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी हजेरी लावली होती. कांदाटी खोऱ्यात 15 गावांमध्ये 221 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्या प्रत्येक गावी या योजनेमधून पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न करण्यात आला. सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी पर्यटन धोरण अंतर्गत ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपाय ग्रामस्थांना सांगण्यात आले. तसेच एकही पात्र घरकुल लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याबाबत संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.
- घराच्या पायाखुदाईवेळी उपस्थित राहणाऱ्या पहिल्या अधिकारी
अलिकडे मोठमोठ्या बिल्डरांच्या अनेक स्किम उभ्या रहात असतात. त्या कार्यक्रमास मंत्र्यांची हजेरी असते. परंतु सर्वसामान्य गरीब कुटुंबाच्या घराच्या पायाखुदाईवेळी स्वत: उपस्थित राहणाऱ्या पहिल्या अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्याकडे पाहिले जात आहे.