बुधवार नाका येथील तळे ठरतेय जीवघेणे
सातारा :
साताऱ्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी सातारा नगरपालिकेने बुधवार नाका येथील शेतकी फार्म येथे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण केलेल्या कृत्रिम तळ्यात जीवजंतूंचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तळ्यातील पाणी दूषित झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन यापूर्वी मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव या ठिकाणी केले जात होते. परंतु पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी गणेशमूर्ती व त्यासोबत त्यामध्ये टाकणाऱ्या निर्माल्यामुळे तळ्यातील पाणी दूषित होऊन दुर्गंधी परिसरात पसरत असल्याचा दावा करीत या तळ्यात मूर्ती विसर्जनास बंदी करण्यास प्रशासनास भाग पाडले.
सार्वजनिक व सामाजिक हित लक्षात घेता पालिकेने लाखो रुपये दरवर्षी खर्च करून बुधवार नाका परिसरात उभारलेल्या कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जनाची सोय केली. त्याचबरोबर या भागातील घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन येथे केले जाते. त्यामुळे या तळ्यात मूर्तीबरोबरच निर्माल्याचा व इतर धार्मिक वस्तूंचा खच पाहायला मिळतो. सध्या या तळ्यातील पाणी आटले असून विसर्जन केलेल्या गणेशमूर्तीचे लाकडी पाठ, लोखंडी वस्तू व विरघळलेले मूर्तीचे अवशेष दिसून येत आहेत.
- पर्यावरणाचे हित सांभाळायला हवे
गणेश विसर्जनाचे धार्मिक पावित्र्य राखणे तसेच मूर्तीची होणारी विटंबना टाळणे गरजेचे आहे. दहा दिवस भक्तीभावाने पूजा करण्यात येणाऱ्या मूर्ती उघड्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत अवशेष पाहून मनाला वेदना होतात.
- तळे स्वच्छ करावे
बुधवार नाका परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या तळ्यातील दूषित झालेल्या पाण्यामुळे जीवजंतूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी या परिसराला रोगराईचा फटका बसला असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक हित लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने हे तळे त्वरित स्वच्छ करून नागरिकांना दिलासा द्यावा.
- श्रीरंग काटेकर, सातारा