समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रवेशाने कागलच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय सुरू होतोय
संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीचा आवाज ऐकू येणार! प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
कागल, / प्रतिनिधी
समरजितसिंह घाटगे यांनी योग्य निर्णय घेतला आहे . लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी हातात तुतारी घेतली प्रचंड मोठ्या मताधिक्याने सर्व ठिकाणी विजयी झाले . पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी समरजितसिंह घाटगे यांच्या हातात विकासाची तुतारी देण्याचा निर्णय घेतला . तो त्यांनी स्वीकारला. यामुळे कागतच्या राजकीय इतिहासात येथून पुढे नवा अध्याय सुरू होतोय असे प्रतिपादन यांनी केले .थोडा वेळ जाऊ द्या संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीचा आवाज ऐकू येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .
येथील गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व समरजीतसिंह घाटगे यांचा पक्षप्रवेश या कार्यक्रमात ते बोलत होते. लोकांच्या प्रचंड गर्दीत हा मेळावा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी आमदार काका पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आमदार बाळासाहेब पाटील, कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष व्ही .बी पाटील, ए. वाय. पाटील, श्रीमंत प्रविणसिंह घाटगे, श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, नंदाताई बाभूळकर, रामराजे कुपेकर , नवोदिता घाटगे, रणजितसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले, काही लोकांचा सरकारी पक्षात गेल्यावर संरक्षण मिळते असा समज झाला .काही लोक भाबडेपणाने कदाचित तिकडे गेले . कायदा हा कायद्याप्रमाणे चालतो. त्यामुळे कितीही वेळ झाला तरी कायदा पाठ सोडत नाही,असा टोला त्यांनी लगावला .
जयंत पाटील म्हणाले, सध्याच्या राजवटीला कंटाळलेला महाराष्ट्र पदोपदी कधी निवडणुका येतील याची चातकाप्रमाणे वाट बघतोय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर दहा पैकी पवार साहेबांनी आठ जागा निवडून आणून दाखवल्या . आज पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे . लोकसभेत महाराष्ट्रातल्या जनतेने 48 पैकी 31 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रांचा पराभव करून दाखवला . महाराष्ट्राची जनता फार चतुर व जानती आहे. विधानसभेत देखील याच पद्धतीने सध्या सत्तेत बसलेल्या सरकारला घालवल्याशिवाय राहणार नाही .महाराष्ट्रातल्या जनतेने तो निर्णय पक्का केलेला आहे. उद्याच्या कागलच्या विधानसभेच्या निवडणुकीत समतेच्या विचाराचे समरजितसिंह घाटगे त्यांना निवडून देऊन समतेचा संदेश पुन्हा एकदा कागलकरांनी महाराष्ट्राला द्यावा.
समरजीतसिंह घाटगे म्हणाले, खा.शरद पवार यांच्यामुळे मला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे. माझ्याकडे शरद पवार व कागल विधानसभा मतदार संघातील जनता आहे. त्यामुळे येत्या काळात परिवर्तन घडविण्याची मूर्हूतमेढ झाली आहे. प्रत्येक घरात तुतारी पोहोचवुया. मतदार संघात सुराज्य निर्माण करूया. कागलचा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्याची वेळ आली आहे. पक्षप्रवेशाचा माझा हा निर्णय कागल, गडहिंग्लज व उत्तुर मतदार संघाच्या भविष्यासाठी व विकासासाठी घेतला आहे. स्व. विक्रमसिंह घाटगे व शरद पवार साहेबांचे राजकारणात पलीकडे संबंध होते असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. यावेळी व्ही. बी पाटील, राजेंद्र जाधव, बाळासाहेब हेगडे, रमीज मुजावर, सागर कोंडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत तालुका अध्यक्ष शिवानंद माळी यांनी केले. आभार अमरसिंह घोरपडे यांनी मानले.
सभेला आर. के. पवार, एकनाथ देशमुख, अश्विनी माने, पद्मजा तिवले, रोहित पाटील, खातेदार पाटील, वैभव शिंदे , अनिल घाटगे, अमरसिंह चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
गर्दीचा उच्चांक
नेहमी पोस्टापर्यंत गर्दी असते. मात्र या सभेला खर्डेकर चौकापर्यंत गर्दी गेली होती. त्यामुळे हा गर्दीचा उचांक झाला आहे. लोकांसाठी सात ठिकाणी क्रीन लावण्यात आल्या होत्या. मुख्य रस्त्यासह बाजारपेठेतही बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
पाऊस आणि मेळाव्याची उत्सुकता
आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. सायंकाळी 4:30 पर्यंत पाऊस होता. त्यामुळे ही सभा कशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र सभा चालू झाल्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबला.
लक्षवेधी फलक
सभेला येताना अनेक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी फलक आणले होते व राम कृष्ण हरी वाजवा तुतारी याचा जयघोष सभेत सुरू होता.
एकच निर्धार राजे आमदार, वारसा शाहूंचा लढा सर्वसामान्यांचा, अशा आशयाची फलक सभेत उंचावले जात होते.
या मागील निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांची नेहमी शेवटची सभा होत असे व ही विजयी सभा असायची. याचा धागा पकडत समरजीतसिंह घाटगे यांनी जयंत पाटील यांनी शेवटची सभा गैबी चौकात घ्यावी अशी मागणी केली. यावेळी ते म्हणाले, मागच्या निवडणूकीत जयंत पाटील यांनी घेतलेल्या सभेमुळे माझा करेक्ट कार्यक्रम केला आहे. टप्प्यात आल्यावर ते कार्यक्रम करतात. आता मागच्या चुका आता दुरुस्त करा. असे ते म्हणाले.
मुश्रीफांच्या बालेकिल्लात पवारांची तोफ धडाडली
कागलमधील गैबी चौक हा मुश्रीफांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्येच शरद पवार यांची मंगळवारी तोफ धडाडली. विशेष म्हणजे समरजित घाटगे यांचा प्रवेशाचा कार्यक्रम गैबी चौकात घेण्याचा हट्ट शरद पवार यांचाच होता.
आता विरोधकांचा कार्यक्रम करा
जयंत पाटील यांची कागलमध्ये विधानसभेच्या निवडणूकीतील सभा निर्णय असते. गत निवडणूकीत याच ठिकाणी त्यांनी निवडणूकीपूर्वी सभा घेऊन माझा कार्यक्रम केला होता. आता यावेळी अंतिम सभेला जयंत पाटील यांनी येऊन विरोधकांचा कार्यक्रम करावा, असा टोला समरजित घाटगे यांनी लगावला.
पाऊस आणि मेळाव्याची उत्सुकता
आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. सायंकाळी 4:30 पर्यंत पाऊस होता. त्यामुळे ही सभा कशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र सभा चालू झाल्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबला.