पोलीस यंत्रणा दबावाखाली वावरतेय
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांचा आरोप : सीबीआय चौकशीची मागणी
बेळगाव : विधान परिषदेत वापरलेल्या अपशब्दावरून सी. टी. रवी यांना टार्गेट करण्यात आले आहे. कायद्याचा दुरुपयोग करीत पोलिसांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली आहे. शुक्रवारी न्यायालय आवारात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. सी. टी. रवी यांना अटक झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते शुक्रवारी सकाळी बेळगावात दाखल झाले आहेत. तर काही नेते विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतरही बेळगावात तळ ठोकून आहेत. विजयेंद्र व अशोक यांनी न्यायालय आवारात सी. टी. रवी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी रवी यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षांसमोर पोलिसांनी दिलेल्या भयानक वागणुकीविषयी माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना आर. अशोक पुढे म्हणाले, यापुढे विधिमंडळाचे अधिवेशन बोलावले तर आम्ही न्यायालयात जामीन अर्ज दाखल करूनच अधिवेशनाला जायला हवे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सी. टी. रवी यांना झालेली अटक, त्यानंतर गुरुवारी रात्रभर बेळगाव, बागलकोट व धारवाड जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांना फिरविलेले प्रकार लक्षात घेता काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी त्यांचा छळ केल्याचा आरोप अशोक यांनी केला.
सी. टी. रवी यांना विनाकारण वेगवेगळ्या ठिकाणी फिरवण्यात येत होते. त्यावेळी सतत काँग्रेस नेत्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना फोन येत होते. त्यानंतर एका खडीमशीनवर त्यांना नेण्यात आले. जंगलातही नेण्यात आले. बोलेरोमधून रवी यांना नेताना सातत्याने पोलीस अधिकाऱ्यांना फोन येत होते. तपास अधिकाऱ्यांवर कोणी दबाव टाकला, याची चौकशी झाली पाहिजे. पोलीस यंत्रणा राजकीय दबावाखाली आहे. खरेतर या घटनेसंबंधी सभापतींनी फिर्याद द्यायला हवी होती. तसे झाले नाही. एकंदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
पोलीस यंत्रणेने दिलेली वागणूक योग्य नाही : बी. वाय. विजयेंद्र
सी. टी. रवी यांना अटक करताना कायद्याचे पालन झाले नाही. दबावाखाली येऊन पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणात कायद्याचा दुरुपयोग झाला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला आहे. शुक्रवारी न्यायालय आवारात पत्रकारांशी बोलताना त्यांनीही या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. विरोधी पक्षातील आमदारांना सरकारने व पोलीस यंत्रणेने दिलेली वागणूक योग्य नाही. अत्यंत अमानुषपणे रवी यांच्याशी पोलिसांनी व्यवहार केला आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यावेळी त्यांनी यासंबंधी सर्व माहिती न्यायालयाला दिल्याचेही विजयेंद्र यांनी सांगितले.