हुबळीत नराधमाचा खात्मा करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक बेळगाव जिल्ह्यातील
मुडलगीमधील गुजनट्टी गावची कन्या : 2019 बॅचच्या अधिकारी
बेळगाव : घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करून अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाचा हुबळी येथे एन्काऊंटर करणारी पोलीस उपनिरीक्षक अन्नपूर्णा या बेळगावच्या कन्या आहेत. धाडसाने त्यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविवार दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास हुबळी येथील एका बालिकेचे अपहरण करून आपण रहात असलेल्या शेडमध्ये नेऊन बिहारी युवक रितेशकुमार (वय 35) याने तिचा खून केला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून अशोकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
तारिहाळजवळ पोलिसांवर हल्ला करून पलायनाचा प्रयत्न करणाऱ्या रितेशकुमारवर पोलीस उपनिरीक्षक अन्नपूर्णा यांनी गोळ्या झाडल्या होत्या. एन्काऊंटरमध्ये नराधमाचा खात्मा करण्यात आला. रितेशकुमार हा गवंडी कामासाठी बिहारहून हुबळीला आला होता. एन्काऊंटरमध्ये त्याचा खात्मा करणारी पोलीस अधिकारी मूळची बेळगाव जिल्ह्यातील आहे. अन्नपूर्णा या मुडलगी तालुक्यातील गुजनट्टी गावच्या. 2019 बॅचच्या त्या पोलीस उपनिरीक्षक आहेत. मुडलगी तालुक्यातील या कन्येचे सर्वत्र कौतुक होत आहे. धारवाडमध्ये बीएस्सी अॅग्री शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेंगळूर येथे त्यांनी एमएस्सी अॅग्रीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पोलीस दलात त्या रुजू झाल्या आहेत. सध्या हुबळी येथील अशोकनगर पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱ्या अन्नपूर्णा यांच्या धाडसाचे बेळगावातही कौतुक करण्यात येत आहे.