For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस अधिकाऱ्याच्या आक्षेपार्ह व्हिडिओने खळबळ

06:45 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोलीस अधिकाऱ्याच्या आक्षेपार्ह व्हिडिओने खळबळ
Advertisement

डीजीपी के. रामचंद्रराव यांचा रासलिलेचा व्हिडिओ व्हायरल : मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश : गृहखाते सादर करणार अहवाल

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि कर्नाटकातील नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे पोलीस महासंचालक के. रामचंद्रराव अडचणीत आले आहेत. ते आपल्या कार्यालयात गणवेशात महिलेसोबत रासलिलेत मग्न असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे खळबळ माजली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गृहखात्याला दिले आहेत. तर रामचंद्रराव यांनी या काळात काहीही शक्य आहे. व्हिडिओ एडीट केलेला आहे, असे सांगून आरोप फेटाळले आहेत.

Advertisement

सोने तस्करी प्रकरणात सहभागी असलेली अभिनेत्री रान्या राव ही के. रामचंद्रराव यांची सावत्र मुलगी आहे. रान्यावर सोने तस्करी प्रकरणात कारवाई झाल्यानंतर के. रामचंद्रराव यांना मार्च 2025 मध्ये सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. नंतर सरकारने त्यांना पुन्हा नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. मुलीच्या सोने तस्करी प्रकरणात रामचंद्रराव यांच्यावरही आरोप झाला होता. आता डीजीपी श्रेणीच्या अधिकाऱ्याच्या रासलिलेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सरकारची कोंडी झाली आहे.

आपल्या कार्यालयात पोलीस गणवेशात रामचंद्रराव हे एका महिलेशी रासलिला करत असल्याचे दृश्य चित्रिफितीमध्ये आहे. वेगवेगळ्या तीन भेटीमध्ये हे कृत्य असणारे व्हिडिओ बनविण्यात आले आहेत. सदर व्हिडिओ सहा-सात महिन्यांपूर्वीचे असल्याचे समजते. या व्हिडिओची सत्यतेची आता पडताळली केली जाणार आहे. मात्र, या प्रकारामुळे रामचंद्रराव यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे.

माजी गृहमंत्र्यांनी केली कारवाईची मागणी

रामचंद्रराव यांच्यावर राज्य सरकारने योग्य कारवाई करावी. यापूर्वी देखील त्यांचे वर्तन योग्य नव्हते. तरी देखील ते गृह खात्यात होते. कार्यालयातच महिलेशी असभ्य वर्तन करणे हा गृह खात्याचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

डॉ. परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न

रासलिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रामचंद्रराव यांनी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची भेट घेऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, परमेश्वर यांनी रामचंद्रराव यांना भेटण्यास नकार दिल्याचे समजते. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना रामचंद्रराव म्हणाले, हे कसे आणि केव्हा घडले?, कोणी व्हिडिओ बनवले, हेच समजत नाही. या काळात काहीही करता येते. याविषयी मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही : सिद्धरामय्या

डीजीपी के. रामचंद्रराव यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतप्त झाले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला जाईल. रामचंद्रराव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच गृहखात्याला चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. रासलिला व्हिडिओ प्रकरणात रामचंद्रराव दोषी आढळल्यास कोणतीही गय न करता कारवाई केली जाईल, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

माझ्याविरुद्ध षड्यंत्र : के. रामचंद्रराव

व्हायरल व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देताना डीजीपी के. रामचंद्रराव म्हणाले, मी देखील तो व्हिडिओ पाहिला आहे. तो पूर्णत: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून किंवा एडिट केलेला आहे. काही स्वार्थींनी माझी कारकीर्द कलंकित करण्यासाठी हे षड्यंत्र रचले आहे. या प्रकारामुळे मला धक्का बसला आहे. बनावट व्हिडिओ बनवून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी वकिलांशी याबाबत चर्चा करेन. कारस्थान रचणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

Advertisement
Tags :

.