येळ्ळूर फुटूक तलावावरील स्मशानाची दुर्दशा
फौऊंडेशनचे काम करण्याची मागणी
येळ्ळूर : येळ्ळूर फुटूक तलावावरील स्मशान शेडमधील शेगडीचे फौंडेशन पूर्णपणे उखडले असून, शेगडी बसवल्यापासून आजपर्यंत त्याच अवस्थेत दहनाचे काम सुरू आहे. याकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन फौऊंडेशनचे काम करावे अशी मागणी जनतेतून होत आहे . या स्मशान शेडकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला असून, पावसाळ्यात चिखलातून वाट काढतच अंत्यविधीसाठी जावे लागते. 2020 साली या मार्गावर मोबाईल टॉवर उभारला आहे. त्यावेळी केबल घालण्यासाठी रस्ता खोदाई केला होता. कंपनीने रस्ता दुरुस्तीसाठी सोडतीन लाखाची भरपाई दिली होती. भरपाई मिळाली. पण, तो निधी रस्त्यासाठी खर्ची पडला नसल्याचे समजते. अंत्यविधीसाठी जाताना बारा ते तेरा पायऱ्या चढून जावे लागते. दहनासाठी जाताना सर्वांनाच मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे समशान शेडपर्यंत रस्ता करावा अशी मागणी जनतेतून होते आहे.