आमटे-तोराळी संपर्क रस्त्याची दुर्दशा
खराब रस्त्यामुळे नागरिकांचे हाल : त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर/जांबोटी
आमटे-तोराळी संपर्क रस्त्याची पार दुर्दशा झाली असून, या रस्त्यावर डांबर नावाला शिल्लक असल्यामुळे, खराब रस्त्यामुळे आमटे व तोराळी परिसरातील नागरिकांची गैसोय होत आहे. तरी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जांबोटी-आमटे या मुख्य रस्त्यापासून आमटे फाटा ते तोराळी गावापर्यंतच्या संपर्क रस्त्याचे अंतर सुमारे पाच किलोमीटर आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. लघु पाटबंधारे खात्याच्या वतीने मलप्रभा नदीवर तोराळी गावानजीक ब्रिज कम बंधाऱ्याची निर्मिती केल्यानंतर दोन्ही गावच्या शेतकरी वर्गांना हा रस्ता वरदान ठरला होता. तसेच गोल्याळी, बेटगिरी, देवाचीहट्टी, तळावडे आदी दुर्गम भागातील नागरिकांना आमटे, जांबोटी या ठिकाणी संपर्कासाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरला आहे. मात्र चार-पाच वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे सद्यस्थितीमध्ये या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.
रस्त्यावर डांबर नावालाच शिल्लक
या रस्त्यावर डांबर नावाला शिल्लक असून, रस्त्यावरील संपूर्ण खडी उखडून वर आली आहे. तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या चरी पडल्या आहेत. मलप्रभा नदीनजीकच्या चढतीच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने, खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रताळी तर उन्हाळ्यात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादित मालाची ने आण करणेही गैरसोयीचे झाले आहे. पावसाळ्यात वाहतूक कोलमडण्याची शक्यता असल्यामुळे रस्त्याअभावी नागरिकांचे व शेतकरी वर्गांचे हाल होणार आहेत. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व लघुपाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तोराळी-आमटे रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.