For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दानामागचे तत्त्वज्ञान

06:07 AM May 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
दानामागचे तत्त्वज्ञान
Advertisement

दानाचा अर्थ व्यापक आहे श्रमदान, विद्यादान, अन्नदान, वस्तूदान, रक्तदान आणि सर्वस्व दान. दान हे सत्पात्री असायला हवे. नाहीतर दोष लागतो. सध्याचा काळ म्हणजे कलीयुग. कलीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. काल जी जीवनमूल्ये उराशी बाळगली. तिच्याविरुद्ध मूल्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. मुठभर सात्विक, प्रामाणिक माणसांमुळेच हे जग चालले आहे.

Advertisement

‘देदान सुटे गिराण’ ही आरोळी अजूनही एका पिढीच्या स्मरणात असेल. पूर्वीच्या काळी अशी समजूत होती की ग्रहणामुळे मानवावर आपत्ती येते. ती टळावी म्हणून ग्रहणानंतर अनेक सत्कृत्ये लोक करीत असत. त्यात दानाचे महात्म्य फार होते. ग्रहणाच्या वेळी केलेले दान अक्षय फळ देते, अशी मान्यता असल्यामुळे दीड हजार वर्षांपूर्वी राजांनी ग्रहणकाली भूमिदान केल्याचे ताम्रपट सापडतात. माणसाच्या हातून दानधर्म घडावा म्हणून पूर्वसुरींनी अनेक योजना करून ठेवल्या. त्यात अधिकमासाचाही समावेश आहे. धर्माचे चार पाय आहेत परंतु कलियुगात त्याचा एकच पाय शिल्लक उरला तो म्हणजे दान. पराशर ऋषी म्हणतात, कलियुगात दान हेच एकमेव श्रेष्ठ होय.

भगवंताच्या संतोषासाठी धर्मयुक्त अंतकरणाने आणि निष्काम बुद्धीने जे दान देतात ते ‘विमल दान’ होय. हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दान म्हणजे सोने-चांदी, वस्त्र आणि मुख्य म्हणजे पैसा. हे समीकरण माणसाच्या मनात ठसले आहे. परंतु दानाचे अनेक प्रकार आहेत. त्यात एक ‘वाचिक दान’ आहे. हे दान कसे? तर जेव्हा माणूस नैसर्गिक, शारीरिक, मानसिक संकटात सापडला असतो तेव्हा त्याला आधार देणाऱ्या शब्दांची फार गरज असते. कवी कुसुमाग्रज यांची ‘कणा’ नावाची सुप्रसिद्ध कविता आहे. त्यात एक तरुण विद्यार्थी गोदावरी नदीच्या पुरामुळे सर्वस्व गमावून बसला. ती कथा सांगायला तो आला आहे. तो धिरोदत्त उमदा तरुण आहे. नैसर्गिक प्रकोपाला त्याने सकारात्मकरित्या घेतले आहे. त्याला कदाचित आपल्याकडून मदत म्हणून पैसे हवे असतील म्हणून त्यांचा हात खिशाकडे गेला. तेव्हा तो म्हणाला, ‘पैसे नकोत सर’.

Advertisement

जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते ‘लढ’ म्हणा. एखादे जिवलग माणूस जेव्हा इहलोकातून अकस्मात नाहीसे होते. तेव्हा फक्त सांत्वनाचे दोन धीर देणारे शब्द हवे असतात. स्वामी समर्थांचे एक वाक्य जणू वेदवाक्य आहे. ते म्हणजे, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ नम्रता, साधेपणा, निस्पृहता, प्रेम, नि:स्वार्थता असणाऱ्या सज्जन व्यक्तीला समाजात पदोपदी संघर्ष करावा लागतो. सच्चेपणा संगे घेऊन जो समाज लाटेच्या विरुद्ध पोहतो, तेव्हा तो आपोआप वर्तुळाबाहेर फेकला जातो. अशावेळी खरे काय? खोटे काय? सत्य कोणते? मित्र कोणते? आपण प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा समाजात आपली टिंगल होते. समाज आपला उपहास करतो तेव्हा ही वाट बदलावी की काय? अशा द्वंद्वात जेव्हा माणूस सापडतो, तेव्हा स्वामी समर्थ डोळ्यांसमोर उभे राहतात. ते म्हणतात, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’. अंधारलेल्या वाटेवर सज्जनांजवळ सदैव असणारे स्वामी समर्थ हे प्रकाशाचे दान भक्तांना देतात.

एक मानसिक दान आहे ते सर्वांची प्रगती व्हावी, उद्धार व्हावा यासाठी आहे. स्वत: मंत्रादी विद्या संपादन करून तिच्या अनुष्ठानाद्वारे दुसऱ्याला त्या विद्येचे फळ मिळवून देणे. सर्व संत मंडळींनी हे मानसिक दान समाज उद्धारासाठी आजन्म दिले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती।’ माऊली ज्या प्रमाणे लेकरांकडून कुठलीही अपेक्षा न करता त्यांच्या काळजीचा भार अंत:करणपूर्वक वाहत असते. त्याप्रमाणेच संत जीवांची काळजी करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मुंगी आणि राव। आम्हा सारखेच जीव’। त्यांच्या घरीच वैकुंठ नांदत होते. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांनी पाठवलेला नजराणा त्यांनी घेतला नाही. ते राजे शिवछत्रपतींना म्हणाले, ‘सांगणे नलगे । सर्वज्ञ तू राजा ।अनाथांच्या काजा साह्य व्हावे’ । तुकोबाराय आणि शिवाजी राजे यांची भेट म्हणजे स्वधर्म व स्वराज्य यांचे ऐक्य होय. असे विद्वान ल. रा. पांगारकर म्हणतात. संत तुकाराम महाराज विठुरायाकडे एक अनोखे दान मागतात. ‘हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा’ । मला मुक्ती, धनसंपदा काहीही नको. सदा सर्वदा तुझी संगती दे म्हणजे झाले. विठ्ठला, तू हे दान दिल्यानंतर मग खुशाल गर्भवास दे. कारण तुझे गोड नाम सदैव स्मरणात असेल तर गर्भावासाचे अनिवार दु:ख हे दु:खच राहणार नाही. सद्गुरु संत निवृत्तीनाथांसमोर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. ही एक युगप्रवर्तक घटना आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या सांगतेला माऊलींचे हृदय भरून आले. ते म्हणाले, ‘काय बहू बोलते सकळा । मेळविलो जन्म फळा। ग्रंथ सिद्धीचा सोहळा ।दाविला जो हा’। माउलींचा जन्म घेण्याचा जो उद्देश होता तो सफल झाला. जगाच्या उद्धारासाठी माऊली प्रकटले. माऊली म्हणजे साक्षात विश्वरूप करूणब्रह्म. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी सद्गुरुंजवळ पसायदान मागितले. ‘आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनी मज द्यावे पसायदान हे’ । ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सिद्ध झाला तो सद्गुरुकृपेने. माऊली म्हणतात, ‘किंबहुना तुमचे केले । धर्मकीर्तन हे सिद्धी नेले’। ते म्हणतात, मी फक्त सद्गुरूंचा पाईक आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वत:कडे कर्मकर्तृत्व घेत नाहीत. सद्गुरुंना ते कृपाप्रसाद अर्थात पसायदान मागतात. ते विश्व उद्धारासाठीच. तेव्हा सद्गुरु निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणतात, ‘येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो हा होईल दानपसावो’ । ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो साकार झाला. हे जगासाठी प्रसादाचे दान होईल. भवसागर तरुन जाण्यास, आध्यात्मिक, मानसिक उद्धार होण्यास ज्ञानेश्वरी समर्थ आहे. पुढे येणाऱ्या कितीतरी पिढ्या उध्दरून जातील. त्यात खंड कधीही पडणार नाही.दानाचा अर्थ व्यापक आहे श्रमदान, विद्यादान, अन्नदान, वस्तूदान, रक्तदान आणि सर्वस्व दान. दान हे सत्पात्री असायला हवे. नाहीतर दोष लागतो. सध्याचा काळ म्हणजे कलीयुग. कलीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. काल जी जीवनमूल्ये उराशी बाळगली. तिच्याविरुद्ध मूल्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. मुठभर सात्विक, प्रामाणिक माणसांमुळेच हे जग चालले आहे. समूहाचे मानसशास्त्र बदलले की व्यक्ती बदलते. हे जाणून आता ‘समयदान’ ही संकल्पना रुजते आहे. सभोवताली माणसांची प्रचंड गर्दी परंतु माणूस एकाकी आहे. रस्त्यात, दुकानात, दवाखान्यात, वाहनात, विमानात आरक्षण असेल, तरच सुविधा लाभते. अन्यथा गर्दीत माणूस हरवून जातो. जो, तो पायाला चाके लावून पळतो आहे. पैसा हेच सुख मनोधारणा पक्की आहे. घरात आजी, आजोबा, लहान मुले, आजारी माणसे एकटी आहेत. त्यांना फक्त दोन गोड शब्दांचा आधार आणि तुमचा थोडासा वेळ हवा आहे. वडीलधारी मंडळींचे दोन अनुभवांचे बोल ऐकायला कुणालाही फुरसत नाही. अशावेळी समयदानाचे मोल फार फार आहे.

स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.