For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : धोपेश्वर गणातील जनता माझ्या कामाची पोचपावती देईल! ; अभिजीत गुरव यांचा विश्वास

01:36 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri news   धोपेश्वर गणातील जनता माझ्या कामाची पोचपावती देईल    अभिजीत गुरव यांचा विश्वास
Advertisement

                            पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात अभिजित गुरव

Advertisement

राजापूर : मी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिलेला आहे. त्यामुळे गेली १५ वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेसाठी आपण जे योगदान दिले आहे, त्याची जाणीव ठेऊन माझ्या धोपेश्वर गणातील जनता मला नक्कीच पंचायत समितीच्या सभागृहात पाठवेल, असा विश्वास धोपेश्वर पंचायत समिती गणातील महायुतीचे उमेदवार अभिजित गुरव यांनी व्यक्त केला आहे.

आपण खरंतर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो. तशी तयारीही केली होती. मात्र राजापुरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुती झाली असून महायुतीकडून धोपेश्वर पंचायत समिती गणाची जागा ही भाजपला देण्यात आली आहे. भाजपकडून या गणातून मला उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचा निर्णय व पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता असल्याने मी हा निर्णय मान्य करून धोपेश्वर पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे गुरव यांनी सांगितले.

Advertisement

मी गेली दहा ते पंधरा वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहे. या काळात मी माझ्या या धोपेश्वर पंचायत समिती गणात वा पंचक्रोशीपुरते काम न करता कायमच तालुक्यातील जनता हाच केंद्रबिंदू ठेऊन काम केले आहे. आजही ग्रामीण भागात अनेक सेवा सुविधांचा अभाव त्या त्या भागात फिरत असताना दिसून आला आहे. या सेवा अधिक चांगल्या करायच्या आहेत. आज ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रात्री-अपरात्री रुग्णालयात येताना वाहन उपलब्ध होत नाही.वैद्यकीय सेवा वेळेत मिळत नाहीत, अशा अनेक समस्या आहेत.

मी आजपर्यंत प्रत्येकवेळी आपल्या परीने प्रत्येकाला सहकार्य व मदतीचा हात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. रात्री-अपरात्री जनतेसाठी आपण कायमच उपलब्ध राहिलेलो आहोत व यापुढेही राहणार आहोत. कोणताही प्रश्न असो, अन्याय असो त्या विरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या विरोधात उभा राहिलेलो आहे. त्यामुळे माझ्या या कामाची जाण नक्कीच माझ्या गणातील जनतेला आहे आणि त्यामुळेच जनता या निवडणुकीत माझ्या पाठीशी ठाम राहील, असा दावा गुरव यांनी केला.

सामाजिक कामाला राजकारणाची जोड हवी कारण त्यातून जनतेचा विकास करणे शक्य होते. त्यासाठी या निवडणुकीत आपण उतरलो असून एक हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून धोपेश्वर गणातील जनता मला काम करण्यासाठी पंचायत समिती सभागृहात पाठवेल, असा विश्वास गुरव यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.