For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावकरांनी अनुभवला शब्दसुरांचा गारवा

11:36 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावकरांनी अनुभवला शब्दसुरांचा गारवा
Advertisement

मर्कंटाईल सेवा संघ-सोसायटी आयोजित स्वरसंध्या कार्यक्रमात रसिक तृप्त

Advertisement

बेळगाव : कवी किशोर कदम (सौमित्र) यांच्या अत्यंत आशयघन भावोत्कट कविता, गायक, संगीतकार मिलिंद इंगळे यांची मनप्रसन्न करणारी गाणी, त्याला अनुरुप नेटके आणि माफक असे समीरा गुजर यांचे निवेदन यामुळे ‘शब्दसुरांचा गारवा’ बेळगावकरांनी बुधवारी अनुभवला. मर्कंटाईल सेवा संघ व मर्कंटाईल सोसायटी यांच्यावतीने आयोजित स्वरसंध्या कार्यक्रमात हा गारवा बरसला आणि रसिकांना तृप्त करून गेला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक राम भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. मर्कंटाईलचे चेअरमन संजय मोरे यांनी स्वागत केले. मैफलीला प्रारंभ करताना मिलिंद यांनी ‘मानसीचा चित्रकार तो’ हे गीत सादर केले. सौमित्र यांनी या गीताची कथाही कथन केली. त्यानंतर गारवामधील सौमित्र यांची प्रसिद्ध कविता ‘रिमझिम धून’ मिलिंद यांनी सादर केली. सौमित्र यांना सुचलेले आणि त्याला चाल लावून संगीतकार म्हणून मिलिंद यांची नवी ओळख सुरू झालेले या दोघांचे गीत म्हणजे ‘दिस नकळत जाई’ हे गीत मिलिंद यांनी सादर केले.

आपल्या आवडत्या गायकाचे गीत म्हणून मिलिंद यांनी ‘मायेच्या हळव्या’ हे गीत म्हटले. सौमित्र यांनी ‘आता तिथे बरेच काही घडत असेल’, ‘मुसळधार पाऊस’, ‘पाऊस दाटलेला’, ‘त्याला पाऊस आवडत नाही’, या कविता अत्यंत प्रभावीपणे सादर केल्या. सूरज बडजात्या यांच्यासाठी मिलिंद यांनी ‘छुई मुई’ हे गीत गायिले व त्यावरून ‘झाडाखाली बसलेले’ हे गीत तयार झाले, असा समज होता. मात्र, आधी मराठी गीत झाले व नंतर ते हिंदीमध्ये आले, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. आपला आवडता गायक किशोरकुमार यांची काही गीते मिलिंद यांनी सादर केली. श्रोत्यांच्या फर्माईशीनुसार मेलडी सादर झाली. ‘रंजीश ही सही’, ‘आज जाने की जिद ना करो’ अशा गझलाही त्यांनी सादर केल्या. कवी सौमित्र यांनी ‘पाणी झरत चालले’, ‘मी शब्द तुला देताना’ अशा कविता सादर केल्या आणि सलग अडीच तासांहून अधिक वेळ रंगत गेलेल्या या मैफलीमध्ये श्रोत्यांनी सादरकर्त्यांना तितकीच उत्स्फूर्त दाद दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.