जनता इराण तर मुनीर अमेरिकेसोबत
पाकिस्तानच्या रस्त्यांवर होतोय गोळीबार, बिघडली स्थिती
इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रs डागली आणि युएई, बहारीन, कुवैत समवेत मध्यपूर्वेत अमेरिकेच्या सैन्यतळांना लक्ष्य केले आहे. इराणमधील युद्धादरम्यान पाकिस्तान, इराक समवेत अनेक देशांमध्ये शिया समुदायाचे लोक निदर्शने करत आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातही शिया समुदायाचे लोक रस्त्यांवर उतरले. इस्लामाबाद, लाहौर यासारख्या प्रमुख शहरांपासून स्कार्दुपर्यंत पाकिस्तानात निदर्शने उग्र आणि हिंसक झाली. हिंसक निदर्शनांदरम्यान पाकिस्तानात जमावाने अमेरिकच्या दूतावासाच्या कार्यालयांमध्ये तोडफोड अन् जाळपोळ केली आहे. यादरम्यान सुरक्षा दलांच्या गोळीबारात 35 जणांना जीव गमवावा लागला आहे.
पाकिस्तानात निदर्शक रस्त्यांवर असून गोळीबार होतोय आणि स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. सुरक्षासिथती पाहता पाकिस्तानात अमेरिकेच्या दूतावासाने व्हिसा आणि अमेरिकन नागरिकांसाठीच्या सेवांच्या सर्व अपॉइंटमेंट्स रद्द केल्या आहेत. दूतावासाने अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांना बाहेर न पडण्याचा निर्देश दिला आहे. तसेच अमेरिकेच्या नागरिकांना गर्दी टाळणे, स्वत:च्या आसपासच्या स्थितीवर नजर ठेवणे आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
सेलेब्सना अश्रू अनावर
इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूवरून पाकिस्तानच्या सेलेब्समध्येही शोक आहे. पाकची प्रसिद्ध टीव्ही सूत्रसंचालिका राबिया अनम ही एका लाइव्ह शोमध्ये रडू लागली. तर पाकिस्तानी अभिनेत्री युमना जैदीने खामेनेईंच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसल्याची टिप्पणी केली आहे.
अमेरिकेसोबत मुनीर
पाकिस्तानात लोक उघडपणे इराणच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. तर सरकार आणि सैन्य अमेरिकेचे समर्थन करत आहेत. व्हाइट हाउसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाहुणचाराचा आनंद घेतलेले पाक सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांची अमेरिकेला साथ आहे. पाकिस्तानने अमेरिकेच्या कारवाईची निंदा करणे टाळले आहे. तसेच अमेरिकेच्या सैन्याला काही प्रमाणात मदतही पुरविल्याचा दावा केला जात आहे.