हुतात्म्यांच्या वारसांचे पेन्शन चार महिन्यांपासून थकीत
मध्यवर्ती म. ए. समितीचे महाराष्ट्र सरकारला पत्र
बेळगाव : सीमालढ्यासाठी बलिदान दिलेल्या सीमाभागातील हुतात्म्यांच्या वारसांना मागील चार महिन्यांपासून पेन्शन मिळालेले नाही. त्यामुळे मध्यवर्ती म. ए. समितीने महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून पेन्शन वेळेत जमा करण्याची मागणी केली आहे. मध्यवर्ती समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी (ओएसडी) मंगेश चिवटे यांना हे पत्र पाठविले आहे. 1986 च्या आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्या सीमावासियांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारकडून पेन्शन दिले जाते. यापूर्वी 10 हजार रुपये पेन्शन दिले जात होते. आता यामध्ये वाढ करण्यात आली असून प्रत्येक वारसाला 20 हजार रुपये पेन्शन दिले जात आहेत. मागील चार महिन्यांपासून पेन्शन जमा करण्यात आले नाही.
निधी नसल्याचे कारण
सीमा हुतात्म्यांच्या आठ वारसांना पेन्शन दिले जाते. परंतु, महाराष्ट्र सरकारकडून पेन्शनसंदर्भात निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने पेन्शन थांबल्याचे स्पष्ट झाले आहे. काही वारसांनी चंदगड तहसीलदारांशी संपर्क साधला असता आमच्याकडे निधी नसल्याचे कारण त्यांनी दिले. त्यामुळे सीमा भागातील हुतात्म्यांच्या वारसांकडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे चार दिवसांपूर्वी बेळगावला आले होते. त्यावेळीही त्यांच्यासमोर ही बाब मांडण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आपण मंत्रालयात जाऊन यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच आता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनेही मंगेश चिवटे यांना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांकरवी सीमा भागातील हुतात्म्यांच्या वारसांना पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.