प्रलंबित ओवळीये पुलाचा प्रश्न अखेर मार्गी !
१.६० कोटी निधी मंजूर ; ओवळीयेवासियांमध्ये समाधान
ओटवणे प्रतिनिधी
दाणोली-देवसू-ओवळीये या ग्रामीण मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या पुलासाठी
१ कोटी ६० लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचा शुभारंभ नुकताच सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. देवसू ते ओवळीये या मुख्य रस्त्या दरम्यानचे हे पूल जीर्ण झाल्यामुळे या पुलाची दयनीय अवस्था झाली होती. या पुलावर भगदाड तसेच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. तसेच या कमी उंचीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र चढाव व वळण आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला होता. माजी उपसरपंच सागर सावंत यांनी याबाबत संदीप गावडे यांचे लक्ष वेधल्यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यासाठी निधी मंजूर केला. या ठिकाणी नवीन पुल पूल बांधण्याचे ग्रामस्थांचे अनेक वर्षां पासूनचे स्वप्न साकार झाल्यामुळे ओवळीयेवासियांनी समाधान व्यक्त केले. या पुलाच्या शुभारंभ प्रसंगी ओवळीयेवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.