For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिपळुणातील राड्यामुळे शांततेला धक्का

06:32 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिपळुणातील राड्यामुळे शांततेला धक्का
Advertisement

राजकीय नेत्यांची उत्तेजक भाषणे आणि तेवढ्याच प्रमाणात निर्माण होणाऱ्या प्रतिक्रीया यामुळे सामाजिक वातावरण ढवळून निघत़े वादाशी संबंधित नसलेल्या लोकांवर त्याचे परिणाम होत असतात़ व्यापार उदिम त्याचबरोबर स्वस्थ समाज जीवनात अस्वस्थता निर्माण होण्यासारखे दीर्घकालीन परिणामही होत असतात़  कोकणात राणे-जाधव संघर्षामध्ये राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आह़े आगामी निवडणुका लक्षात घेऊन राजकीय नेत्यांनी केलेले वर्तन अधिक दखलपात्र झाले आह़े

Advertisement

कोकणला राणे विरूध्द जाधव हा वाद काही नवीन नाही. 2010 च्या सुमारास या वादाची सुरूवात झाली. एका कार्यक्रमात उच्चारला गेलेल्या काही शब्दांवरून उडालेल्या ठिणगीचे पुढे वणव्यात रूपांतर झाले. त्याचे पर्यवसान पुढे चिपळुणात एकमेकांची पक्ष कार्यालये फोडण्यापर्यंत झाले होत़े त्यावेळी आघाडी सरकारमध्ये नारायण राणे व जाधव हे दोघेही मंत्रीमंडळात होते, हे विशेष. त्यानंतरही या दोन्ही नेत्यांमध्ये आरोपांचे वाक्युध्द हे अधूनमधून सुरूच राहिले. मात्र मध्यंतरी हे सारे काही थांबलेले असतानाच उबाठा गटाच्या जनसंवाद यात्रेत ठिणगी पडली आणि त्याचे पुढे वणव्यात रूपांतर झाले. शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौरा केल़ा या दौऱ्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाविरुद्ध प्रामुख्याने टीका केल़ी त्यांच्यासोबत भास्कर जाधव उपस्थित होत़े त्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध जोरदार टीका केल़ी त्याविरुद्ध राणे गटातून प्रतिक्रिया येणे हे साहजिक होत़े

सिंधुदुर्गातील कणकवलीच्या सभेत आमदार जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केल़ी त्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागरात येऊन या टीकेला उत्तर देण्याचे घोषित केल़े त्याचवेळी पेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाधव यांना चोप देण्याची भाषा वापरली. त्यानंतर आमदार जाधव यांना राणे यांच्या समर्थकांतून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. जाधव समर्थकांनी पोलीस स्थानकात रितसर तक्रार देऊन राणेंच्या गुहागरातील सभेला प्रतिबंध करण्याची मागणी केली होती.

Advertisement

माजी खासदार नीलेश राणे यांनी शृंगारतळी येथे जाहीर सभा घेऊन आमदार भास्कर जाधव यांना उत्तर देण्याचे ठरवल़े ती सभा ठरल्याच्या दिवशी चिपळूणातील आमदार जाधव यांच्या कार्यालयासमोर त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजिला होत़ा माजी खासदार नीलेश राणे हे गुहागर-शृंगारतळी येथील सभेला जाण्यापूर्वी पागमळा येथे आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाजवळ झालेल्या स्वागतानंतर आमदार जाधव व राणे समर्थक आमनेसामने आले. यातून मग राणे-दोन्ही समर्थकांमधून तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत खुद्द राणे यांची अलिशान कार फुटल्यानंतर राणेंसह कार्यकर्ते आणखीनच खवळले. या दगडफेकीत 5 पोलिसांसह दोन्ही गटातील 40 हून अधिक कार्यकर्ते जखमी झाले. तर 60 वाहनांची तोडफोड व एका शोरूमच्याही काचा व गाड्या फुटून नुकसान झाले. अश्रूधूरांच्या कांड्या फोडूनही जमाव न पांगल्याने अखेर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेनंतर महामार्गावर दगडांचा खच पडला आहे.

किरकोळ दगडफेक सुरू असताना राणे ज्या गाडीत होते, त्या रेंज रोव्हर गाडीची मागची काच दगडफेकीत फुटली. त्यामुळे राणे स्वत: खाली उतरले व आमदार जाधव यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना पोलिसांनी अडवले. मात्र ते स्वत: खाली उतरल्याने समर्थक आणखीनच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांचे कडे तोडून शिवसेनेच्या कार्यालयाकडे आगेकूच करीत दिसेल ती कार फोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरू झाली. ही धुमश्चक्री अर्धा तास सुरू होती.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच अश्रूधूरांच्या कांड्या फोडण्यात आल्या. मात्र त्याचा तितकासा परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर मात्र लाठीचार्ज सुरू करण्यात आला. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची पळापळ सुरू झाली. काही वेळात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपआपल्या वाहनांमध्ये बसल्याने काही वेळातच नीलेश राणे पुढील सभेसाठी गुहागरकडे निघून गेले.

या राडेबाजीनंतर चिपळूण पोलिसांनी तब्बल 400 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दगडफेकीचे व्हिडीओ तपासून कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली असून दुसऱ्या दिवशी जाधव यांच्या 3 समर्थकांना अटक करण्यात आली आहे. उर्वरितांचा शोध सुरू असला तरी अटकेच्या भीतीने दोन्ही गटातील समर्थक पसार झाल़े स्फोटक परिस्थिती असताना पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी तरी दिली कशी? असे प्रश्न जसे एका बाजूला उपस्थित केले जात आहेत, तसेच दुसऱ्या बाजूला आमदार जाधव यांच्या कार्यालयाजवळ दुपारनंतर वाढत चाललेली गर्दी, सुरू असलेली घोषणाबाजी या सर्वांकडे डोळेझाक केली गेल्याने वातावरण क्षणाक्षणाला तापत गेले आणि पुढे त्याचा परिणाम राडेबाजीत झाला असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आह़े

राणे आणि जाधव यांचे समर्थक किती असू शकतात आणि ते कोणती पावले उचलू शकतात याचा अंदाज गृहखात्याला निश्चितपणे आह़े सभा घेऊन आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार मान्य केला तरी मारहाण, दगडफेक आणि राडेबाजी टाळण्यासाठी गृहखात्याने पुरेशी काळजी घेतली होती, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आह़े सरकारमधील वरिष्ठांना परिस्थितीचा अंदाज बांधता येऊ नय़े, चिपळूणात राड्यासारखे प्रकार व्हावेत हे आश्चर्यजनक आह़े सरकारकडे गुप्त माहिती काढण्यासाठी विशेष विभाग आह़े या विभागाचे काम परिणामकारक रितीने होते का, आणि या विभागातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम मजबूतीने होत़े हे म्हणणे ही धाडसाचे ठरावे, अशी राजकीय परिस्थिती आह़े सुसंस्कृत राजकीय नेत्यांची परंपरा असलेल्या कोकणात केवळ राजकीय भाषणबाजी नव्हे तर दगडफेकीपर्यंतचे प्रकार व्हावेत हे सामाजिक प्रगतीचे लक्षण आहे काय? यातून सवाल उभा रहात आह़े

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणे दूर असले तरी त्या लवकरच होणार असे चित्र आह़े  प्रत्येक राजकीय नेत्याला दमदार वाटचाल दाखवायची असेल तर काहीतरी विशेष गोष्ट करुन दाखवणे आवश्यक वाटत़े तथापि राड्यासारख्या घटना या सामाजिक शांततेला नक्कीच धक्का देणाऱ्या ठरु शकतात़

सुकांत चक्रदेव

Advertisement
Tags :

.