भूमिपूजनासाठीचा मंडप ग्रामस्थांनी रातोरात उखडून काढला
बांदा -दाणोली राज्यमार्गाच्या भूमिपूजनाला ग्रामस्थांचाच तीव्र विरोध ; मागण्या मान्य झाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही ; ग्रामस्थ ठाम
ओटवणे । प्रतिनिधी
कोल्हापुर ,आंबोलीवरुन गोव्याला जाणार्या पर्यटकांना जवळचा ठरणारा सावंतवाडी तालुक्यातील बांदा ते दाणोली या राज्यमार्गाचे भूमिपुजन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फॅट मालवणी हॉटेल समोर, सातुळी येथे करण्यात आले आहे .ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. या रस्त्यासाठी १२८ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु , सातुळी - बावळाट ग्रामस्थांनी या भूमिपूजनाला कडाडून विरोध केला असून भूमिपूजनसाठी उभारण्यात आलेला मंडप ग्रामस्थांनी रातोरात उखडून काढून टाकला आहे .रस्ता रुंदीकरण होणार पण त्याचा मोबदला गावातल्या लोकांना काय मिळणार? काही लोकांच्या जमिनी जाणार तर काहींची घरे सुद्धा जातील. मग त्याचा मोबदला सरकारने आम्हाला द्यायला हवा. शिवाय हा रस्ता कशा पद्धतीने होणार , सर्विस रोड कुठे व कसे होणार. या बाबतची ग्रामस्थांना कोणतीच कल्पना दिलेली नाही. या सर्व गोष्टींची पडताळणी केल्याशिवाय रस्ता करायला देणार नाही असे बांधकाम विभागला पत्र देऊन सुद्धा कोणालाच विचारात न घेता रस्त्याचे उद्घाटन परस्पर ठरवले असाही आरोप ग्रामस्थांनी रात्री घेतलेल्या सभेत केला आहे