Kolhapur News : सहकारातही पक्षाची ताकद वाढली पाहिजे : उदय सामंत
04:29 PM Apr 05, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
गोकुळ आणि जिल्हा बँक या सहकारी संस्थात आपली ताकद वाढली पाहिजे
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेचे सदस्य आहेत. याठिकाणी पक्षाची ताकद आहे. याबरोबरच गोकुळ आणि जिल्हा बँक या सहकारी संस्थात आपली ताकद वाढली पाहिजे असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले शिंदे सेनेच्या संघटना बांधणीसंबंधी येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढवण्याचे आपण ठरवले पाहिजे. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत आपल्या पक्षाचे सदस्य आहेत. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही लक्ष घातले पाहिजे. येथेही आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले संजय मंडलिक यांचा पराभव कशामुळे झाला, यामध्ये आता मी जाणार नाही. मात्र पुढील निवडणुकीत पक्षांची बांधणी चांगली केली तर ते दीड लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात पक्ष प्रथम क्रमांकावर घेऊन जायचा आहे. याचा अर्थ आम्ही २०२९ मध्ये स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार आहे, असा होत नाही. महायुती म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.