मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील
मंत्री सतीश जारकीहोळी : माध्यमांना दिली प्रतिक्रिया
प्रतिनिधी/ बेळगाव
मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, त्याबाबत पक्षश्रेष्ठी (हायकमांड) निर्णय घेतील, असे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. येथे शनिवारी माध्यमांसमोर ते बोलत होते.
काँग्रेस पक्षात मंत्री होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र केवळ 34 जणांनाच मंत्रीपद मिळण्याची संधी आहे. सध्या असलेल्या मंत्रिमंडळातून कोणाला हटविणे व कोणाला मंत्रीपद देणे हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. याबाबत मी काहीच सांगू शकत नाही व मला अधिकारही नाही, असे मंत्री जारकीहोळी म्हणाले.
30 महिन्यांनंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा झाली होती. ती वेळ आता जवळ आली आहे. पुनर्रचनेबाबत नवी दिल्ली येथे चर्चा झाली असावी. तेथे पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे होणार आहे. काल शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रथमच जाहीरपणे मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत भाष्य केले आहे. मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी मंत्रिपदाचा त्याग करणार असल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, पक्षश्रेष्ठींनी सूचना केल्यास कृष्ण भैरेगौडा एवढेच नव्हे तर आम्हालाही सूचनेचे पालन करावे लागते.
विधानपरिषदेचे सदस्य यतिंद्र सिद्धरामय्या यांनी पेलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, सिद्धरामय्यांची अहिंद संघटना पुढे चालविण्याची क्षमता सतीश जारकीहोळी यांच्यातच आहे, असे म्हटले आहे हे खरे. पण याला वेगळाच अर्थ कोणी लावू नये.