For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माझ्याकडे कोणती जबाबदारी द्यावी हे पक्ष, मुख्यमंत्री ठरविणार : तवडकर

12:29 PM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
माझ्याकडे कोणती जबाबदारी द्यावी हे पक्ष  मुख्यमंत्री ठरविणार   तवडकर
Advertisement

मडगाव : माझ्याकडे कोणती जबाबदारी द्यावी हे पक्ष आणि मुख्यमंत्री ठरविणार आहेत. माझ्याकडे सभापती म्हणून असलेली जबाबदारी मी चांगल्या प्रकारे पेलत आलो आहे. जर एखादी अन्य जबाबदारी सांभाळावी असे पक्षाला वाटत असेल, तर पक्ष आणि मुख्यमंत्री तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केली. मडगावात श्री बलराम शैक्षणिक संस्थेच्या उपक्रमांबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी काल शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. आपण हिरिरीने सामाजिक कार्य करत आहात. सामाजिक कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आणि अतिरिक्त जोमाने करण्यासाठी राजकीय पाठबळाची गरज असते.

Advertisement

त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आपणास मंत्रिपद दिले गेले, तर आपण त्यास तयार आहात काय, असा सवाल या प्रतिनिधीने केला असता तवडकर म्हणाले की, आपण आता सभापती आहे. या पदाचा सगळ्यात चांगला उपयोग करून घेत असंख्य सामाजिक कार्ये केली आहेत, असे सांगत त्यांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पक्षाकडून मंत्रिपद दिले गेले, तर ते स्वीकारणार काय असे विचारले असता, आतापर्यंत पक्षाकडून देण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी आपण सक्षमपणे पेललेली असून यापुढेही पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी पेलत राहीन, असे त्यांनी सांगितले. या विषयाला वेगळे वळण देण्याची गरज नसून आवश्यक निर्णय पक्ष आणि मुख्यमंत्री घेतील, असे तवडकर म्हणाले. आपण 2005 पासून आमदार आहे. आपण केडरमधून आलेलो आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या परिस्थितीतून गेलो आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्ष घेईल, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.

‘उटा’चा साधा सदस्यही नाही

Advertisement

दरम्यान, ‘उटा’ संघटनेचा आपण साधा सदस्यही नसल्याचे तवडकर यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. आपण ‘गाकुवेध’चा पदाधिकारी होतो व संघटनेमार्फत एसटी दर्जा मिळेपर्यंत खूप काम केले. सर्व समाजांत मतभेद हे असतातच. नवरा-बायकोत, भावा-भावात आणि गावा-गावातही मतभेद हे असतातच. आता आदिवासी आणि ‘उटा’ यांच्यात मतभेद आहेत असे नाही. आपणास अनुसूचित जमातींसंदर्भात एखाद्या गोष्टीला वा समस्येला प्राधान्य देणे गरजेचे आहे असे दिसले, तर ते आपण आपल्यापरीने करत आलेलो आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडे खाते, मग कामे कशी नाही होणार ?

‘एसटी’ची कामे होत नाहीत असा जो सूर व्यक्त करण्यात येत आहे त्याबद्दल तवडकर यांचे मत विचारले असता हे खाते मुख्यमंत्री सांभाळत असल्याने कामे कशी होऊ शकणार नाहीत, असा उलटा सवाल त्यांनी केला. आपण जेव्हा जेव्हा सदर खात्याच्या अधिकाऱ्यांकडे कामे घेऊन गेलो तेव्हा तेव्हा ती कितीही कठीण असली, तरी त्यातून मार्ग काढून ती पूर्ण झालेली आहेत, असे तवडकर यांनी स्पष्टपणे सांगितले. एसटी भवनच्या प्रश्नात मला ओढू नका, जे काही आहे ते संचालकांना विचारल्यास ते तुम्हाला खडान्खडा माहिती देतील, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.