For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीची प्रभाकर स्वामींच्या पालखीशी भेट; सोलापूरनगरी वैष्णवांच्या मेळ्याने दुमदुमणार

03:59 PM Jul 16, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीची प्रभाकर स्वामींच्या पालखीशी भेट  सोलापूरनगरी वैष्णवांच्या मेळ्याने दुमदुमणार
Advertisement

सोलापूर : आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त दरवर्षी सोलापुरातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पालखीचा व श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा ऐतिहासिक भेटीचा सोहळा शनिवारी (दि. १८) दुपारी १२ वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात संपन्न होणार आहे.

Advertisement

गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असलेली ही पालखी भेटीची परंपरा सोलापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि वारकरी परंपरेतील एक मानाचा व ऐतिहासिक सोहळा म्हणून ओळखली जाते. दोन महान संतपरंपरांचा संगम असलेल्या या सोहळ्यात संत श्री गजानन महाराज आणि श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या भक्तांचा प्रेम, श्रद्धा, समता आणि भक्तिभावाचा अद्वितीय मिलाफ अनुभवायला मिळतो. दरवर्षी हजारो वारकरी व भाविक या दिव्य सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात.

या प्रसंगी श्रीक्षेत्र शेगाव येथून आलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंदिरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. दोन्ही संतांच्या पादुकांचे पूजन, आरती, पुष्पवृष्टी, हरिनाम संकीर्तन आणि टाळ-मृदंगाच्या निनादात पालखी भेटीचा सोहळा संपन्न होणार आहे.

Advertisement

या दिवशी संत श्री गजानन महाराजांना अत्यंत प्रिय असलेला पिठलं-भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वप्रथम शेगावहून आलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या वारकरी भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शेगावहून येणाऱ्या वारकरी भाविकांच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन शनिवारी (दि. १८) सकाळी ९ वाजल्यापासून श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचे दर्शन तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रशस्त वॉटरप्रूफ शेडमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पालखी भेटीचा संपूर्ण सोहळा सर्वांना सहज पाहता यावा यासाठी दोन मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

या दिव्य आणि ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सोलापूर शहर व परिसरातील तसेच महाराष्ट्रभरातील सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी भेटीचा अलौकिक सोहळा, संतांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.