पाकिस्तानी बुरख्याची होणार चिरफाड !
मुंबईवरील 26/11 हल्ल्यानंतर अमेरिकन एफबीआयने डेव्हीड हेडली आणि तहव्वूर राणा या दहशतवाद्यांना अटक केली. यावेळी मुंबई क्राईम ब्रँचने हेडलीची न्यायालयासमोर व्हिडीओ कॉन्फरान्सिंगद्वारे चौकशी आणि कबुली जबाब घेतला. त्यानंतर दुसरा दहशतवादी तहव्वूर राणाचा ताबा देखील देशाला मिळाला आहे. राणाचा कबुली जबाब आणि चौकशीतून मिळणारी माहिती यातून पाकिस्तानी बुरख्याची पुन्हा एकदा चिरफाड होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबई शहरात 26 नोव्हेंबर 2008 साली पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी हल्ला करीत एकच हाहाकार उडवुन दिला होता. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या (एनएसजी) कमांडोंनी प्रयत्नांची शिकस्त करत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करीत अजमल कसाब या दहशतवाद्याला अटक केली. त्यानंतर अजमल कसाबला फासावर चढविण्यात आले. या झाल्या हल्ला करणाऱ्या प्याद्या. मात्र या प्याद्यांना हुकुम देणारे वजीर आणि आका अद्यापही मोकाट फिरत होते. मात्र यातील अनेक म्होरके पाकिस्तानातच मारले गेले. त्यांच्यावर जिवघेणे हल्ले झाले त्यातच ते मारले गेले. त्यांचा मृत्यू म्हणजे 26/11 हल्यात शहीद झालेले जवान तसेच पोलीस अधिकाऱ्यांना एक प्रकारे श्रद्धांजली. तर सामान्य नागरिकांना मिळालेला न्याय. या हल्यामागे पाकिस्तानच असल्याचे अनेक पुरावे मुंबई पोलीस तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिल्याने पाकिस्तानच्या बुरख्याची चिरफाड करण्यात आली. मात्र सुंभ जळाला तरी पिळ जात नाही अशी अवस्था पाकिस्तानची आहे. एवढ्यावरच न थांबता मुंबई पोलीस दलाच्या क्राईम ब्रँचच्या प्रमुखपदी असताना अतुलचंद्र कुलकर्णी यांनी डेव्हीड हेडलीची मुंबईच्या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे नोंदविलेल्या जवाबामुळे या हल्यामागे पाकिस्तानच असल्याची पुष्टी झाली. एवढेच नाही तर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या विशेष पोलीस महासंचालकपदी असताना अतुलचंद्र कुलकर्णी यांनी 26/11 हल्यातील दुसरा एनआरआय दहशतवादी तहव्वूर राणाचा अमेरिकेकडून ताबा घेण्यासाठी जंगजंग पछाडले. त्यानुसार अमेरिकन न्यायालयाने तहव्वूर राणाचा ताबा भारताकडे दिला. याचे सर्व श्रेय हे अतुलचंद्र कुलकर्णी यांना जाते. आज तहव्वूर राणाचा ताबा एनआयएला मिळाला असून, त्याची गेल्या आठ दिवसापासून कसून चौकशी सुऊ आहे. या चौकशीत पाकिस्तानच्या बुरख्याची पुन्हा एकदा चिरफाड होणार आहे हे मात्र नक्की.
भलेही सध्या तहव्वूर राणा एनआयएला चौकशीसाठी मदत करीत नाही. मात्र एनआयएने भल्या-भल्यांची तोंडे उघडली आहेत. तर हा तहव्वूर राणा काय चीज आहे. पाकिस्तानातून आलेल्या या दहशतवाद्यांच्या हल्यात केवळ भारतीय नागरिकच मारले गेले नाहीत तर इस्त्रायल, अमेरिकासह इतर देशांचे नागरिक देखील मारले गेले होते. यामुळे या देशांनी 26/11 हल्यात भारतीय तपास यंत्रणांना मदत केली होती. त्यानुसार, अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशनने (एफबीआय) डेव्हीड हेडली आणि तहव्वूर राणा या दोन लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना शिकागो विमानतळावर अटक केली. यावेळी दोघांनीही मुंबईवर झालेल्या हल्याची जबाबदारी घेतली. मात्र हे दोन्ही दहशतवादी भारताचे गुन्हेगार असल्याने, त्यांचा ताबा मिळविण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा आणि भारत सरकारने जंग जंग पछाडले. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण म्हणजे राज्य सरकार आणि मुंबई पोलीस तसेच सर्व तपास यंत्रणांचे यश तर आहेच. मात्र मुंबईकरांचा देखील तळतळाट आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबियातील सदस्य गमाविले, त्यांचे तळतळाट नक्कीच तहव्वूर राणाला लागले. तहव्वूर राणा या दहशतवाद्याने त्याच्या साथीदारासह मिळून 56 तास मायानगरी असलेल्या मुंबईला वेठीस धरले होते. या हल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, संदीप उन्नीकृष्णन या अधिकाऱ्यांना मरण पत्करावे लागले होते. तर 166 मुंबईकर हकनाक बळी गेले होते.
यामुळे जोपर्यंत या हल्यातील कर्त्याधर्त्याना शिक्षा होत नाही, तोपर्यंत या मृतांच्या आत्म्यांना शांती मिळणार नाही की त्यांच्या नातेवाईकांना चैन पडणार नाही. एवढेच नाही तर यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांनी 26/11 हल्याचा अभ्यास आहे, तसेच यातील दहशतवाद्यांना ज्यांनी हाताळले आहे, ज्या अधिकाऱ्यांनी या दहशतवाद्यांची चौकशी केली आहे, त्या अधिकाऱ्यांना तहव्वूर राणा संदर्भात संपर्क साधल्यास याचा नक्कीच फायदा एनआयए तसेच केंद्र-राज्य सरकारला होईल. त्याचप्रमाणे, या हल्यासाठी परदेशातून आणखी कोणी मदत केली? पाकिस्तानचे परदेशातील हस्तक कोण आहेत? या सर्वांची चिरफाड तहव्वूर राणा कऊ शकतो.
तसेच देशात पाकिस्तानचे आणखी कोणी स्लिपर सेल आहेत का? तसेच मुंबईत त्याला आणि हेडलीला कोणी मदत केली? कारण स्थानिक मदतीशिवाय एवढा मोठा हल्ला करणे शक्य नाही. या सर्वांची माहिती राणाकडे आहे. तो भारत सरकारला देईल. त्यासाठी त्याच्यावर साम-दाम-दंड भेद नितीचा वापर करावाच लागेल. तसेच मुंबई पोलिसांना राणाचा ताबा मिळाल्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद आणि त्याचे कट्टर साथीदार तसेच पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पडतील. लष्कर-ए-तोयबाच्या अनेक दहशतवाद्यांचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आला आहे. हे कोणी केले हे अद्याप समोर आले नाही. मात्र जे झाले ते चांगलेच झाले. हा हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना दोन वर्षे प्रयत्न करीत होती. यासाठी त्यांनी डेव्हीड हेडली आणि स्थानिक स्तरावर मदत करण्यासाठी तहव्वूर राणा आणि त्याच्या ट्रॅव्हल एजन्सीचा उपयोग कऊन घेतला. तहव्वूर राणा हा मुळत: पाकिस्तानी. मात्र
कॅनडात स्थलांतरीत झाल्यावर त्याने येथील नागरिकत्व घेतले. त्यानंतर येथे कंपनी स्थापन करीत त्याची एक शाखा अमेरिकेत उघडली. नेमके याच ठिकाणी त्याचा शाळकरी मित्र डेव्हीड हेडली भेटला. त्यानंतर आयएसआय, हेडली, राणा आणि हाफीज सईद यांची पाकिस्तानात भेट होत 26/11 हल्ल्याचा कट शिजला. यावेळी राणाने हेडलीला त्याच्या कंपनीच्या कागदपत्रासह मुंबईत एक कार्यालय उघडण्यासाठी पाठविले. पाच वेळा हेडली हा राणाच्या कंपनीच्या कागदपत्रासह मुंबईत येऊन त्याने हल्ला नेमका कुठे-कुठे करायचा? याची रेकी केली आणि तो वास्तवात उतरविला. यामुळे तहव्वूर राणाचा जबाब आणि त्याची चौकशीतून मिळालेली माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानी बुरख्याची नक्कीच चिरफाड करेल.
- अमोल राऊत