राजकुमार अन् मानुषीची जोडी
बॉलिवूडचा दमदार अभिनेता राजकुमार रावचा नवा अॅक्शन ड्रामा चित्रपट ‘मालिक’मध्ये माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर नायिका म्हणून झळकणार आहे. हा चित्रपट 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि गीत प्रदर्शित करण्यात आले आहे. मालिक या चित्रपटात मानुषी ही राजकुमारच्या प्रेयसीची भूमिका साकारेल. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये राजकुमार रावसोबत मानुषी दिसून येत आहे. मालिक एक गँगस्टर ड्रामा असून तो 1988 च्या अलाहाबादच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. राजकुमार यात एका क्रूर गँगस्टरची भूमिका साकारत आहे. चित्रपटात सामाजिक मुद्द्यांनाही स्पर्श करण्यात आला आहे. कहाणीत अॅक्शन, ड्रामा आणि प्रेमाचे मिश्रण आहे. चित्रपटात राजकुमार राव आणि मानुषीसोबत बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चटर्जी दिसून येणार आहे. तसेच मेधा शंकर आणि हुमा कुरैशी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याचबरोबर अनशुमान पुष्कर, स्वानंद किरकिरे, सौरभ शुक्ला, ऋषी राज भसीन आणि अनिल झमझम हे कलाकार देखील आहेत. या चित्रपटचे दिग्दर्शन पुलकितने केले आहे. यापूर्वी त्याने भक्षक आणि बोस: डेड/अलाइव्ह यासारख्या प्रोजेक्ट्सची निर्मिती केली होती. चित्रपटाची निर्मिती टिप्स फिल्म्सचे कुमार तौरानी आणि नॉर्दर्न लाइट्स फिल्म्सच्या जय शेवकरमानी यांनी केली आहे.