Gokul Election 2026 हलाल सर्टिफिकेटवरुन गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई का नाही? संस्था प्रतिनिधींचा गोकुळ प्रशासनाला सवाल
कोल्हापूर : हलाल प्रमाणपत्रावरून गोकुळची नाहक बदनामी करणाऱ्यांवर अजून कारवाई का केलेली नाही, अशी विचारणा संस्था प्रतिनिधींनी गोकुळ प्रशासनाला केली. प्रशासक सदस्य सागर बलकवडे आणि चंद्रकांत परुळेकर यांनी संस्थाप्रतिनिधींशी चर्चा करून यावर लवकरच कार्यवाही होईल असे सांगितले.
आखाती देशामध्ये दुग्ध उत्पादने निर्यात करण्यासाठी घेतलेल्या हलाल प्रमाणपत्रामुळे गेले पंधरा दिवस गोकुळची बदनामी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्ह्यातील प्रमुख दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी गोकुळ शिरगाव येथे जाऊन प्रशासक मंडळाची भेट घेतली. भेटलेल्या या शिष्टमंडळात मनोज फराक्टे, विकास पाटील, मयूर आळवेकर, निलेश शिंदे यांचा समावेश होता.
संस्था प्रतिनिधींनी गेल्या आठ दिवसांपासून समाज माध्यमावर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून गोकुळची बदनामी होत असताना गुन्हे दाखल का करत नाही, आम्ही गोकुळ ब्रँड इतका प्रेमाने जोपासला असताना कोणी अशी नाहक बदनामी करत असेल तर त्याला धडा हा शिकवावाच लागेल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही व्हिडिओ टाकणाऱ्यावर कारवाई करा, त्यांची सायबर सेलकडे तक्रार करा अशी मागणी केली.
गोकुळ बंद पाडायचा आहे काय?
गोकुळ दूध संघाची बदनामी करुन तुम्हाला काय संघ बंद पाडायचा आहे का? तुम्ही कारवाई केली नाही तर संस्था दुसरीकडे दूध घालायला लागल्या तर होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, आठ दहा लाख जणांचे संसार मोडण्याचे पाप तुमच्या माथ्यावर घेऊ नका, इतके जण गोकुळची बदनामी करत आहेत, तरी तुम्ही गप्पा का? अशी प्रश्नांची सरबत्ती संस्था प्रतिनिधींनी प्रशासक मंडळाचे सदस्या परुळेकर यांच्यावर केली. यावर परुळेकर निरुत्तर झाले.
प्रकाश बेलवाडे यांच्यावर कारवाई करा
गोकुळमध्ये याचिकाकर्ते असलेले प्रकाश बेलवडे यांनीच हलाल प्रमाणपत्राचा मुद्दा बाहेर काढला होता. येथूनच गोकुळची बदनामी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांच्यावर आधी कारवाई करायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. ही गंभीर बाब असल्याने गोकुळचने खबरदारी म्हणून आधीच सायबर सेलकडे तक्रार करुन ठेवली आहे. शिवाय कायदेशीर कारवाईचा देखील इशारा दिला आहे. तरीदेखील असले प्रकार थांबत नसतील तर आणखी कठोर पावले उचलली जातील असे प्रशासक मंडळ सदस्य चंद्रकांत परुळेकर आणि सागर बलकवडे यानी आश्वस्त केले आहे.
प्रशासकांना कोंडले... अन् अफवा
गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत म्हणून प्रशासकांना संस्था प्रतिनिधींनी कोंडून ठेवले आहे असा संदेश आला अन् एकच धावपळ उडाली. काही क्षणात पोलीस आणि माध्यम प्रतिनिधींनी गोकुळ शिरगावमधील कार्यालय गाठले. तेथे बघतो तर काय संस्था प्रतिनिधी आणि प्रशासक मंडळ सदस्य निवांतपणे चपाती भाजी खात बसले होते. असा काही प्रकार झाला नाही असा खुलासा करावा लागला.