विरोधकांचा एल्गार
मतचोरीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने सध्या आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर 19 पक्षांच्या आघाडीने केलेले शक्तिप्रदर्शन हा त्याचाच भाग म्हणावा लागेल. किंबहुना, आंदोलनाची ही धग कायम ठेऊन सरकारविरोधी वातावरण कायम ठेवण्याचे विरोधकांपुढे आव्हान असेल.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागांमध्ये आंदोलन सुरू आहे. विविध राजकीय पक्षांसह संस्था, संघटनांचाही या आंदोलनांमध्ये सहभाग दिसतो. यामुळे दिवसेंदिवस या आंदोलनाचे लोण सर्वदूर पसरत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी सीजेपीसह इतर संघटनांनीही दिल्लीमध्ये मोठे आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलनापूर्वीच निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे आंदोलनाला वेसण घालण्याचे सरकारचे प्रयत्न सफल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हे आंदोलन शमणार का, असे वातावरण होते. परंतु, इंडिया आघाडीने मतचोरीचा मुद्दा अधिक धारदार करीत सरकारची चोहूबाजूने कोंडी केल्याचे पहायला मिळते. या आंदोलनाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे त्यामध्ये दिसलेली विरोधकांची एकजूट. तृणमूल, सपा, राजद, माकप, नॅशनल
कॉन्फरन्ससह तब्बल 19 राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी झाले. यातील ममता बॅनर्जी यांचा बदललेला सूर सर्वाधिक लक्षवेधी ठरतो. ‘माझ्या नेत्या सोनियाजी’ अशी त्यांनी भाषणाची केलेली सुरुवात आणि ‘हक्कासाठी लढणारे तरुणांचे नेते,’ असा राहुल गांधी यांचा केलेला उल्लेख बरेच काही सांगून जातो. त्यामुळे भविष्यात तृणमूल काँग्रेसच्या अधिक जवळ जाण्याची वा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता बळावते. स्वाभाविकच यातून काँग्रेसचे देशाच्या राजकारणातील महत्त्व वाढण्यास मदत होऊ शकेल. मधल्या काळात काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे चित्र होते. भाजपने दिलेला काँग्रेसमुक्त भाजपचा नारा आणि काँग्रेसजनांमधील मरगळ यामुळे पक्षाच्या भवितव्याचाच प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेसने आता राजकारणाचा अवकाश व्यापण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांच्याकडेही देशातील लोक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचे पहायला मिळते. अर्थात सरकारचे काही चुकीचे निर्णय व लोकशाहीसंदर्भातील संकुचित वृत्तीही याला कारणीभूत आहे, असे म्हणता येईल. तरीही काँग्रेस व इंडिया आघाडीसमोरील आव्हान सोपे नसेल. एक, दोन आंदोलने यशस्वी झाली म्हणजे मैदान जिंकले, असा अर्थ होत नाही. लोकसभा निवडणुकीला अद्याप अडीच ते तीन वर्षे आहेत. तोवर ही धग विरोधक कायम राखतील का, हा प्रश्न आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक सत्ताधारी व विरोधक दोघांसाठी सत्त्वपरीक्षा असेल. देशाच्या सत्तेचा मार्ग हा यूपीतून जातो, असे म्हणतात. तेथे विधानसभेच्या तब्बल 403 जागा आहेत. मुळात सपा व काँग्रेसमध्ये सहमतीने जागावाटप करणे, ही वाटते तितकी सहजसुलभ बाब नाही. पंजाबमध्येही आप व काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष आहे. अन्य काही राज्यांमध्येदेखील काँग्रेस व घटक पक्षांमध्ये सत्तास्पर्धा आहे. त्यामुळे हे ऐक्य टिकविण्याचे इंडिया आघाडीपुढे आव्हान राहील. खरेतर दिल्लीतील रामलीलावरील आंदोलनात सीजेपीचाही सहभाग असेल, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात कॉक्रोचवाले आंदोलनापासून दूर राहिले. काँग्रेस व सीजेपीतील अंतरच यातून स्पष्ट होते. भाजपसाठी हे नक्कीच चांगले लक्षण. आगामी काळात विरोधकांची कशी विभागणी करता येईल, त्यांच्यात कशी फूट पाडता येईल, हाच भाजपाचा प्रयत्न असेल. त्यामुळे शक्तीइतकीच युक्तीही महत्त्वाची आहे, हे विरोधकांनी विसरू नये. इंडिया आघाडीच्या शक्तिप्रदर्शनाला सत्ताधाऱ्यांनीही महारॅलीतून उत्तर दिले. विरोधकांचे मोर्चे निघाले, की त्याला प्रत्युत्तर म्हणून रस्त्यावर उतरण्याचा नवीन पायंडाच सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी पाडला आहे. अशाने अपयश झाकले जाईल का, याचे संबंधितांनी आत्मपरीक्षण करावे. मतदार पुनरीक्षण प्रक्रियेत निश्चितच काही त्रुटी आहेत, असे सर्वसामान्यांना वाटते. त्यामुळे या मुद्द्यावर सरकारला फारशी सहानुभूती नाही. अर्थात त्यांनी इतके समजून घेतले, तरी पुरे.
