वाळवंटात वाहणारी भारतातील एकमात्र नदी
दोन राज्यांमधून वाहते नदी
भारतात नद्यांना एक खास स्थान प्राप्त आहे. भारतीय लोक नदीला देवता मानून तिची पूजा करत असतात. देशात जवळपास 200 मोठ्या नद्या असून त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांची तहान भागविली जाते, तसेच देशातील कृषीक्षेत्र या नद्यांच्या पाण्यावरच अवलंबून आहे.
या नद्या श्रद्धेचे केंद्र देखील आहेत आणि लोकांच्या गरजाही त्या पूर्ण करतात. आमच्या देशात गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, ब्रह्मपुत्रा, कावेरी, सिंधू यासारख्या नद्यांविषयी सर्व जण जाणतात. परंतु थारच्या मरूस्थळात वाहणाऱ्या नदीविषयी लोकांना फारशी माहिती नसते. या नदीला देखील स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार धार्मिक महत्त्व आहे.
भारतातील थार मरूस्थळात वाहणारी लूनी नदी ही अनेकार्थाने खास आहे. लूनी नदीचा उगम राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील नाग पर्वत किंवा नागा पर्वतरांगेत होतो. ही नदी राजस्थान आणि गुजरातमधून कच्छच्या रणात विलीन होते. लूनी नदी ही देशातील वाळवंटात वाहणारी एकमेव नदी आहे. याचमुळे या नदीचे भौगोलिक महत्त्व अधिक आहे. लूनी नदीमुळे भारतातील वाळवंटी प्रदेशात राहणारे लोक तसेच प्राण्यांची तहान भागत असते.
ही नदी कुठल्याही समुद्रात सामावत नाही. तर या नदीचे पाणी काही ठिकाणी गोड तर काही खारट असते. ही नदी 495 किलोमीटर लांब वाहणारी असून या नदीचे पाणी बाडमेर जिल्ह्यातील बालोतरानंतर खारट होते. याकरता वाळवंट कारणीभूत असल्याचे मानले जाते.