मुक्ती मिळवणे हेच एकमेव ध्येय माणसाने बाळगावे
अध्याय सहावा
ही दुनिया म्हणजे एक जत्रा आहे. त्यात निरनिराळ्या प्रकारची खाऊरुपी प्रलोभने आहेत. वेळ घालवण्यासाठी निरनिराळी खेळणी आहेत पण जो भक्त देवदर्शनासाठी आलेला असतो तो इकडेतिकडे कुठंही न पाहता, इथंतिथं न रेंगाळता सरळ देवळात जाऊन देवदर्शन घेतो. बाप्पा म्हणतात, मनुष्यजन्माचा सदुपयोग करून घे अन्य गोष्टीत वेळ न घालवता योगाभ्यास करून ईश्वरस्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न कर. त्याला शरण जा. जीवनामध्ये धनदौलत, सत्ता, लोकांचे प्रेम ह्या गोष्टी कितीही मिळवल्यास तरी तुझा उद्धार होण्याच्या दृष्टीने त्यांचा काहीही उपयोग नाही. माणसाला धन, सत्ता, प्रिय व्यक्ती, नातेवाईक, सगेसोयरे, मित्र यांचा भरवसा वाटत असतो पण प्रारब्धानुसार ओढवलेल्या संकटसमयी ईश्वरच आपले रक्षण करतो हे तो विसरतो. सर्वजण एकाच ईश्वराचे अंश असल्याने तोच माय, बाप, बंधू, सखा अशा निरनिराळ्या रुपात अडीअडचणीच्यावेळी कुणाच्या ना कुणाच्या रुपात येऊन मदत करत असतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सर्व मी लोकांचं हित व्हावं म्हणून कळकळीने सांगतो आहे असं बाप्पा पुढील श्लोकात सांगतात,
तत्तेऽहं शृणु वक्ष्यामि लोकानां हितकाम्यया ।
अस्ति ज्ञेयं यतो नान्यन्मुत्तेश्च साधनं नृप ।। 2 ।।
अर्थ- हे नृपा, लोकांच्या हिताच्या इच्छेने मी ते तुला सांगतो. ऐक, जाणण्याला योग्य व मुक्तीचे साधन त्याहून दुसरे काही नाही.
विवरण-आपल्या भक्तांचं हित व्हावं एव्हढ्या एकाच इच्छेने बाप्पा गणेशतत्व जाणून घ्या असा उपदेश करत आहेत. मनुष्यजन्माला आल्यावर मुक्ती मिळवणे हेच एकमेव ध्येय माणसाने बाळगावे आणि त्यासाठी गणेशतत्व जाणून घेणे यासारखे दुसरे साधन नाही. मनुष्यावर मायेचा जबरदस्त प्रभाव असल्याने त्याला स्वत:पुढे इतर कशाचे मोल वाटत नाही. समोर दिसणाऱ्या वस्तू कधी ना कधी नाश पावणाऱ्या आहेत हे माहीत असूनही त्या मिळवण्यासाठी तो आकाशपाताळ एक करतो. या सगळ्या गडबडीत त्याचे ईश्वराकडे लक्ष जात नाही. हे लक्षात घेऊन बाप्पा सांगतायत की, मुक्ती मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल कर आणि त्यासाठी गणेशतत्व जाणून घेणे हा राजमार्ग आहे. गणेशतत्व समजले की, ईश्वरीस्वरूप आपोआप समजू लागेल, आपण कोण आहोत, आपलं मूळ काय आहे इत्यादि प्रश्नांची उत्तरे मिळतील. यासाठी बाप्पाना शरण जाऊन त्यांच्या ठिकाणी चित्त एकाग्र करायचं आहे. त्यासाठी बाप्पाच आपले त्राता आहेत, भाग्यविधाते आहेत ही बाब मनात पक्की झाली पाहिजे. ईश्वराचं स्वरूप समजलं की, इतर सर्व मिथ्या असून ईश्वर भक्त खरा आहे हे लक्षात येतं. असं झालं की, इतरांच्याकडून अपेक्षा बाळगणं बंद होतं आणि जन्ममृत्युच्या चक्रातून आपल्याला मुक्ती मिळते.
गणेशतत्व जाणून घेण्यासाठी प्रथम माझी प्रकृती जाणून घे असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
ज्ञेया मत्प्रकृतिऽ पूर्वं ततऽ स्यां ज्ञानगोचरऽ ।
ततो विज्ञानसम्पत्तिर्मयि ज्ञाते नृणां भवेत् ।। 3 ।।
अर्थ- अगोदर माझी माया ( प्रकृति ) जाणावी. नंतर मला जाणावे. मला जाणल्यावर त्या मनुष्याला अनुभवयुक्त ज्ञानरूपी संपत्ती प्राप्त होते.
विवरण- बाप्पा सांगतायत प्रकृती म्हणजे माया. या मायेचं स्वरूप आधी जाणून घे. माया जाणून घेतलीस की, ती खोटी कशी हे तुझ्या लक्षात येईल. मिथ्या मायेचं ज्ञान झालं की, तिला बाजूला करून तू माझे तत्व सहजी जाणू शकशील. माझे तत्व जाणणे हे खरे ज्ञान होय. त्यासाठी मायेला बाजूला करता यायला हवं. माझ्या तत्वाला जर ज्ञान म्हंटलं तर मायेला जाणून घेणं ह्याला विज्ञान म्हणता येईल. क्रमश: