जुना कपिलेश्वर तलाव बनला कचराकुंड
निर्माल्य कुंड हटविल्याने नागरिकांकडून कचराफेक
बेळगाव : शहरातील प्रमुख विसर्जन तलाव असलेला कपिलेश्वर विसर्जन तलाव सध्या भयावह परिस्थितीत आहे. कचराकुंड की विसर्जन तलाव? हे समजणेही अवघड झाले आहे. ज्या ठिकाणी गणेशमूर्ती, दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन होते, त्याच ठिकाणी सर्व कचरा टाकला जात आहे. या प्रकारामुळे विसर्जन तलावाचे पावित्र्य राखले जाईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कपिलेश्वर जुन्या तलावात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. यापूर्वी या ठिकाणी निर्माल्य कुंड ठेवण्यात आले होते. यामध्ये कचरा टाकला जात होता. परंतु, आता थेट विसर्जन तलावामध्येच कचरा तसेच प्लास्टिकचे साहित्य टाकले जात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना वरचेवर या ठिकाणची स्वच्छता करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी भान बाळगत येथे कचरा टाकण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे.
परिसरात कचराकुंडीची आवश्यकता
निर्माल्य कुंड हलविल्यामुळे कचरा टाकण्यास जागा उपलब्ध नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनावरून ये-जा करतानाच कचरा फेकला जात आहे. यापूर्वीच्या मनपा आयुक्तांनी शहरातील ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी विशेष मोहीम आखली होती. परंतु, कपिलेश्वर विसर्जन तलावात कचरा टाकला जाणार नाही, याची खबरदारी आता सवर्नांच घ्यावी लागणार आहे.