आंबेडकर पुतळा सुशोभिकरणासाठी कुर्डुवाडी पंचायत समितीचे जुने सभापती भवन मिळावे
रिपाइं चे पंचायत समितीपुढे ठिय्या आंदोलन
कुर्डुवाडी :
येथील पंचायत समिती जुने सभापती भवन हे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणासाठी उपलब्ध करुन द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रिपाइं (आ) गटाच्यावतीने पंचायत समितीवर मोर्चा काढून सुमारे एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी संबंधित विभागाचे प्रमुख असलेले बीडीओ व उप अभियंता हे गैरहजर असल्याने आंदोलन आणखी तणाग्रस्त झाले होते.यावेळी संबंधित दोन्ही अधिकारी आंबेडकरविरोधी व जातीयवादी असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
कुर्डुवाडी शहरात मध्यवर्ती ठिकाणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी पंचायत समितीचे जुने वापरात नसलेले सभापती भवन आहे. सदर सभापती भवनाची जागा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणासाठी मिळावी म्हणून रिपाइं ने १५ आक्टोबर २०२४ रोजी नगरपालिकेसमोर आंदोलन केले होते. त्याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना ही निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी नगरपालिकेकडून ठराव प्राप्त झाल्यानंतर जागा उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी दिले होते. मात्र नगरपालिकेने पत्र व ठराव देऊनही पंचायत समितीने कोणतीही कार्यवाही न कल्याने शुक्रवार दि.३१ रोजी रिपाइं (आ) गटाने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज पंचायत समिती समोर आंदोलन केले. यावेळी गटविकास अधिकारी आणि अभियंता यांना चर्चेसाठी लेखी पूर्वसूचना देऊनही ते मोर्चाला सामोरे न आल्याने सुमारे एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी व अभियंता यांच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा देखील वाचण्यात आला.त्यामध्ये आंदोलनकर्त्यांकडून विधानसभा निवडणूक काळात गटविकास अधिकारी हे माढा तालुक्यातील रहिवासी असल्यामुळे त्यांची बदली अन्य तालुक्यात किंवा जिल्ह्यात होणे अपेक्षित होते मात्र त्यांच्या पदाचा व ओळखीचा गैरफायदा घेऊन निवडणूक काळात याच मतदारसंघात मतदान प्रक्रियेत जाणीवपूर्वक हस्तक्षेप केला व तालुक्यातील रोजगारहमी कामातही मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्याचीही तक्रार पालकमंत्र्याकडे करु असे सांगण्यात आले.
तरी उक्त जागा तात्काळ हस्तांतरीत करण्यात यावी. अन्यथा येत्या काळात पंचायत समितीसमोर मशाल मोर्चा काढू व त्यावेळी होणाऱ्या परिणामाला आपण जबाबदार असाल असेही यावेळी सांगण्यात आले.
सुमारे एक तास आंदोलनानंतर आंदोलनकर्ते सहा गटविकास अधिकारी यांच्या केबिनमध्ये जाऊन गटविकास अधिकारी व उप अभियंता गैरहजर असल्याबाबत व सदर प्रस्ताव जिल्हापरिषदेला का पाठवला नाही याबाबत जाब विचारत घोषणाबाजी केली. त्यानंतर सहा.गटविकास अधिकाऱ्यांकडून सदर प्रस्ताव पुढे पाठवण्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.