वनखात्याच्या कार्यालयाचे होणार सुशोभिकरण
धोकादायक झाडे हटविली, नवीन रोपांची लागवड
बेळगाव : वनखात्याच्या कार्यालय आवारात असलेली धोकादायक झाडे हटवून त्याठिकाणी नवीन रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे वनखात्याचे कार्यालयाचे आता सुशोभिकरण होणार आहे. यासाठी 10 लाख रुपयांचा निधी खर्ची घातला जात आहे.वनखाते दरवर्षी जंगल परिसरात लाखो रोपांची लागवड करून वनक्षेत्र वाढविते. याच वनखात्याच्या कार्यालयात आता विविध रोपांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये जंगली वनौषधी आणि काही फळांच्या रोपांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे येत्या काळात वनखात्याच्या कार्यालय आवाराचे रुपडे बदलणार आहे.
कार्यालयाच्या परिसरात आर्युमान संपलेली धोकादायक निलगिरीची झाडे होती. गतवर्षी दोन झाडे उन्मळून पडली होते. शिवाय यंदाच्या पावसाळ्यात एक धोकादायक झाड कोसळले होते. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले होते. याची दखल घेत वनखात्याने धोकादायक झाडे हटविली आहेत आणि परिसर मोकळा केला आहे. याठिकाणी आता नवीन रोपांची लागवड करून आवारात हिरवळ वाढविली जाणार आहे. कार्यालयाच्या आवारातील भली मोठी निलगिरीची झाडे हटवून जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरणाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी विविध वनौषधी, जंगली व शोभिवंत झाडे यासह वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात वनखाते कार्यालय नागरिकांना भुरळ घालणार आहे.
वनखाते आवार रुपडे बदलणार
परिसरात असलेली निलगिरीची धोकादायक झाडे हटविली आहेत. शिवाय सपाटीकरण करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी धोकादायक झाडे कोसळल्याने चिंता व्यक्त होत होती. या ठिकाणी नवीन रोपांची लागवड करून सुशोभिकरण केले जाणार आहे.
-नागराज हळेबैलूर, (एसीएफ बेळगाव)