देशाभिमान प्रत्येकाच्या मनात रुजावा हाच सेवासंकल्प अभियानाचा उद्देश
खासदार विश्वेश्वर हेगडे : नंदगड येथे रांगोळी स्पर्धा
वार्ताहर/नंदगड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीनिमित्त सेवासंकल्प अभियान राबविण्यात येत आहे. हे सेवा अभियान केवळ भाजपाचे नव्हे तर देश सेवेचे काम आहे. या अंतर्गत वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, योगासने, ज्योतीयात्रा, प्लास्टिकमुक्त भारत अशी विविध 25 समाजोपयोगी कार्य केली जात आहेत. देशाभिमान प्रत्येकाच्या मनात रुजावा हाच या अभियानाचा मुख्य संकल्प आहे. महिनाभर चालणाऱ्या या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी सेवा संकल्प अभियानानिमित्त नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीच्या कल्याण मंडपात आयोजित केलेल्या वृक्षारोपण व रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार अरविंद पाटील होते.
यावेळी मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन श्रीशैल माटोळी, भाजपाचे नेते जोतिबा रेमाणी, बसवराज सानिकोप, विठ्ठल पाटील, रेणुका धबाले, प्रवीणा फठाण, प्रमोद कोचेरी, पंडित ओगले, संजय कुबल, लक्ष्मण बामणे, मल्लाप्पा मारिहाळ, सयाजी पाटील आदींसह भाजपाचे अनेक कार्यकर्ते, मार्केटिंग सोसायटीचे संचालक उपस्थित होते. यावेळी रांगोळी स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके दिली. स्पर्धेत महिलासह मुलीही सहभागी झाल्या होत्या. माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, देशातील भाजप सरकारने रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास केल्याने वाहतूक व्यवस्था उत्तम प्रकारे सुरू आहे. उपस्थितांचे स्वागत भाजपचे नेते व मार्केटिंग सोसायटीचे संचालक प्रकाश गावडे यांनी केले. माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी यांनी आभार मानले. यावेळी खासदार व अन्य मान्यवरांच्या हस्ते मार्केटिंग सोसायटीच्या परिसरात झाडे लावण्यात आली.