विमान कंपन्यांमध्ये महिलांची संख्या वाढणार
वर्ष 2024 च्या सुरुवातीला जाहीर होणार रुपरेषा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी एक रोडमॅप तयार करत आहे. याद्वारे विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून या संदर्भातील आराखडा 2024 च्या सुरुवातीस सादर करण्याची योजना आखण्यात येणार आहे.
डीजीसीए प्रमुख विक्रम देव दत्त यांनी ही माहिती दिली. ते ‘वुमन इन एव्हिएशन इंडिया’ पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना बोलत होते. सर्व कल्पनांवर विचार केला जात असून पुढच्या वर्षी सुरुवातीला हवाई क्षेत्रात महिलांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक त्या पर्यायांचा साकल्याने विचार केला जात आहे. यासाठी एक आराखडाही बनवला जात आहे, असे दत्त यांनी सांगितले
भारतीय वैमानिकांपैकी सुमारे 15 टक्के महिला आहेत, ज्या जागतिक पातळीवर सर्वाधिक आहेत. दत्त म्हणाले की, डीजीसीएमधील 11 टक्के कर्मचारी महिला आहेत. महिलांचा जास्तीत जास्त सहभाग कसा करुन घेता येईल यावर विचारमंथन करण्यात येत आहे.
देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यासाठी डीजीसीएने या वर्षी ऑगस्टमध्ये चार सदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीचे सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संचालन संचालक सुरविता सक्सेना, प्रशिक्षण संचालक आरपी कश्यप, उपसंचालक (प्रशासन) पवन मालवीय आणि उपसंचालक (विमान अभियांत्रिकी संचालनालय) कविता सिंग यांचा समावेश आहे.