कुशल-अकुशल कामगारांची संख्या वाढणार
2027 पर्यंत 24 लाख नोकऱ्या : इंडिडच्या सर्वेक्षणामधून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘क्विक कॉमर्स’च्या वेगाने होणाऱ्या वाढीमुळे कुशल आणि अर्ध-कुशल (ब्लू-कॉलर) मॅन्युअल कामगारांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. इंडीड इंडियाच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. रोजगार मंचानुसार, 2027 पर्यंत भारतात 24 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचेही यावेळी म्हटले आहे.
इंडीड इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार म्हणाले की, ‘क्विक कॉमर्स’ कंपन्यांनी गेल्या तिमाहीत उत्सवी खरेदी आणि ई-कॉमर्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 40,000 हून अधिक कामगारांना कामावर ठेवले. यावेळी त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘भारतातील ‘क्विक कॉमर्स’ उद्योग जलद वाढीच्या मार्गावर आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी ‘ब्लू-कॉलर’ कामगारांच्या भरतीमध्ये आम्हाला लक्षणीय वाढीचे संकेत दिसत आहेत. यामुळे येत्या काळातही ‘उद्योग जसजसा विस्तारत आहे तसतसे कुशल आणि अर्ध-कुशल कामगारांची गरज वाढत आहे, ज्यामुळे भरती अधिक स्पर्धात्मक होत आहे. नियुक्त्या वाढत्या तंत्रज्ञान-चलित वातावरणाशी जुळवून घेऊ शकतील अशा प्रतिभावान लोकांचा शोध घेणे सुरु असल्याचेही स्पष्ट केले आहे.
क्विक कॉमर्सचे क्षेत्र खुणावतेय
इंडीडने केलेल्या सर्वेक्षणानुसार, डिलिव्हरी ड्रायव्हर्स आणि रिटेल कामगारांसह या पदांसाठी सरासरी मासिक बेस पगार सुमारे 22,600 रुपये आहे. सर्वेक्षणात असे आढळून आले की, ‘भारताला विविध उद्योगांमध्ये 24 लाखांहून अधिक ‘ब्लू-कॉलर’ कामगारांची आवश्यकता असेल. या पाच लाख नोकऱ्यांपैकी बहुतेक नोकऱ्या केवळ ‘क्विक कॉमर्स’ क्षेत्रात निर्माण होण्याची शक्यता आहे.