For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय राजकारणातील ‘मार्गदर्शक’ वाढू लागले

06:13 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय राजकारणातील ‘मार्गदर्शक’ वाढू लागले
Advertisement

मार्गदर्शक मंडळ जेव्हा भाजपमध्ये स्थापन झाले तेव्हा त्याचा बराच बभ्रा झाला. आणि ते साहजिकच होते. 2014 च्या मेमध्ये पक्षाला स्वबळावर केंद्रात आणून नरेंद्र मोदींनी अटकेपार जणू झेंडे लावले होते. कोणताही नेता जेव्हा उदयास येतो तेव्हा तो आपल्या कल्पना घेऊन येतो, आपली माणसे घेऊन येतो. आपल्या साथीदारांना पुढे आणण्यासाठी त्याला बरीच मेहनत करावी लागते. राजकीय क्षेत्रात तण भयंकर माजलेले आहे असा कांगावा करून जुन्या जाणत्या नेत्यांना सक्तीने घरी बसवावे लागते.

Advertisement

मुघलांच्या काळात अगोदरच्या बादशहाच्या जवळच्या माणसांचा नवीन राजा सफाया करायचा. अकबराने अधिकारावर आल्यावर त्यावेळचा सर्वात प्रभावी असा सरदार बहिराम खानाचा असाच काटा काढला होता. अकबर सत्तेत आल्यावर बहिराम निवृत्त होऊन तिर्थयात्रेला निघून गेला. पण चाणाक्ष अकबराने मात्र तरी त्याचा काटा काढला. तात्पर्य काय तर अकबर असो की औरंगझेब ते आपली वाट निष्कंटक करण्यासाठी नेहमीच तत्पर राहिले. त्यामुळे मोदींनी सत्तेवर आल्यावर एक युक्ती अमलात आणून एका झटक्यात पक्षातील लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासहित सर्वच धुरिणांना एका डावात धोबीपछाड केले. ज्यांचे वय 75 झाले आहे अशा सर्वच नेते मंडळींना नव्याने स्थापन केलेल्या वादग्रस्त अशा मार्गदर्शक मंडळात घालून त्यांनी त्यांना एकप्रकारे तीर्थयात्रेस पाठवले. आता तुमचे, ‘हरी, हरी’ म्हंणायचे दिवस आलेले आहेत. त्यामुळे निपचित पडून राहा. हालचाल नको. आवाज तर अजिबात नको. या मार्गदर्शक मंडळाची गेल्या 12 वर्षात अजून एकदाही बैठक झाली नाही त्यावरून तिची उपयुक्तता ध्यानात येते.

गमतीची गोष्ट अशी की 45 वर्षाच्या नितीन नबीन यांना पक्षाध्यक्ष बनवून पक्षाला अजून तरुण बनवायचे सुतोवाचच त्यांनी केले असल्याने या मार्गदर्शक मंडळात येत्या काळात बरीच भर पडणार अशी चर्चा आहे. ‘जूने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुरून टाका’, असे कवीने म्हटलेच आहे.

Advertisement

2026 उजाडता उजाडता विरोधी पक्षात देखील एक ‘मार्गदर्शक मंडळ’ निर्माण झालेले आहे. त्यात औपचारिक काहीही नसले तरी त्यात ज्यांचा समावेश आहे त्या नेत्यांना आज आपण राजकारणात अजून चांगलेच सक्रिय आहोत असे वाटते. नव्वदीचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचेच बघा. त्यांनी नुकतीच पंतप्रधानांची तोंडभर स्तुती केली पण त्यांना काय मिळाले, त्यांचे राज्यसभेचे तिकीट कापले गेले. ‘आता माझे वय झाले, मी लढणार नाही’ अशी त्यांनी अगोदर भूमिका घेतली असती तर अब्रू वाचली असती.

शरद पवारांची अवस्था फारशी वेगळी नाही, त्यांना राज्यसभा मिळाली असली तरी ती फार आनंदाने मिळालेली नाही हे राज्यातील सर्व संबंधितांना माहित आहे. महाराष्ट्राचे राजकारण ज्या व्यक्तीभोवती जवळजवळ अर्धशतक फिरले त्याचे फिरलेले दिवस खचितच सुखकारी नाहीत. ‘ऑपेरेशन टायगर’ करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पेकाट मोडणारी भाजप नजीकच्या भविष्यकाळात पवारांच्या राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवेल अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांची अवस्था फारशी वेगळी नाही. ज्याप्रकारे गृहमंत्री अमित शाह त्यांच्यामागे हात धुवून लागले आहेत त्याने त्यांच्यामागे मोठेच शुक्लकाष्ठ लागणार हे स्पष्ट आहे.

मायावती यांची उत्तर प्रदेशातील दलित समाजावरील पकड अजून कायम असली तरी त्यांनी भाजपच्या उदयापासून अतिशय निक्रिय बनून भाजपला मदत करण्याचे राजकारण चालवल्याने त्यांचा प्रवास हा हळूहळू मार्गदर्शक मंडळाकडेच सुरु आहे. उत्तरप्रदेशातील येती निवडणूक त्यांच्या भवितव्याकरता महत्त्वाची आहे. त्या जर शर्थीने लढल्या तर भाजपला जड जाईल असे जाणकार मानतात.

गेल्या 20 वर्षातील आपल्या राजकीय उड्यांमुळे ‘पलटू राम’ अशी औपरोधिक उपाधी मिळवलेले नितीशकुमार यांचे पानिपत कसे झाले ते त्यांचे त्यांनादेखील कळले नाही, असे बिहारमधील घटनांनी दिसून आले आहे. भाजपचा विधानसभा निवडणूकीत वरचष्मा झाल्यानंतर अलगदपणे मुख्यमंत्रीपदावरून नितीश यांची उचलबांगडी करून त्यांना राज्यसभेचा सदस्य बनवण्यात आल्याने बिहारमधील नितीश युग संपुष्टात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची वाटचाल ही वानप्रस्थाश्रमाकडे सुरु असल्याचे दिसते. एकेकाळी स्वत:ला विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे दावेदार भासवणाऱ्या नितीश यांचे संयुक्त जनता दल आता भाजपचे बाहुले बनलेले आहे.

के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून एकीकडे भाजपशी छुपी हातमिळवणी केली आणि दुसरीकडे काँग्रेसविरुद्ध मोहीम चालवून स्वत:ला तिसऱ्या आघाडीचा मोठा नेता बनवण्याचा प्रयत्न केला. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले अशी त्यांची अवस्था झालेली आहे. रेवंत रे•ाr यांनी लीलया सत्ता तर त्यांची घेतलीच पण आता त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या केसेस दाखल केलेल्या आहेत. स्वत:च्या कुटुंबातील वाढत्या वितुष्टाने त्यांना ‘मार्गदर्शक’ होणे भाग पडले आहे.

काँग्रेस सोडल्यापासून गुलाम नबी आझाद हे राजकारणातील बिनबुडाचा लोटा झालेले आहेत. त्यांना फारसे कोणी विचारात नाही. जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या पक्षाचे बारा वाजले आहेत कारण सारे मुख्य नेते परत काँग्रेसमध्ये आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेमुळे त्यांचे दिल्लीतील आलिशान घर शाबूत आहे आणि काही सरकारी समित्यांवर त्यांना सरकारचा पिठू असल्याने नेमले गेलेले आहे. त्यांचा एकेकाळचा जलवा गायब झालेला आहेच पण ते स्वत:च गायब झालेले आहेत असे दिसत आहे.

एकीकडे आजार आणि दुसरीकडे खटले यांच्याशी झुंजत असलेले 78 वर्षांचे लालू यादव बिहारच्या राजकारणात आपला दबदबा राखून आहेत, त्यांनी आपला मुलगा तेजस्वी यादवला जबाबदारी देऊन राजकारणातून एकप्रकारे मुक्त झालेले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या 88 वर्षाच्या फारूक अब्दुल्ला यांनी आपला मुलगा ओमर याला जमू आणि काश्मीरचा मुख्यमंत्री बनवून राजकारणातून हळूहळू अंग काढून घेण्याचे काम चालवले आहे. पण फारूक यांच्यासारखी लोकांना बरोबर घेऊन जाण्याची कला ओमरकडे नसल्याने पक्षाला पुढे खडतर काळ येऊ शकतो असे बोलले जाते. 81 वर्षाच्या मार्क्सवादी नेते पिनारायि विजयन यांची केरळातील सत्ता गेल्याने त्यांचा प्रवास हा मार्गदर्शक मंडळाकडेच सुरु झालेला आहे. डाव्या चळवळी संकटाच्या भोवऱ्यात अडकल्या असताना विजयन हे त्यांचे शेवटचे मुख्यमंत्री होते.

तामिळनाडूतील सत्ता गेल्यावर 73 वर्षाचे एम के स्टालिन यांची राजकीय विजनवासाकडे वाटचाल सुरु झाली आहे, असे एकंदर घटनांतून प्रतित होत आहे. फिल्म स्टार विजयच्या टी वी के पक्षाच्या दैदिप्यमान विजयाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह सारे काही द्रमुकच्या सोडून विजयला मिळाले आहेत. द्रमुकचे खांदे पाठीराखे समजले जाणारे वाइको देखील स्टालीनना राम राम ठोकून विजयकडे आले आहेत. स्टालिन यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी केलेला अमाप भ्रष्टाचार त्याच्या पराभवाला कारणीभूत आहे असे हे पूर्वाश्रमीचे मित्र पक्ष म्हणत आहेत.

मुख्यमंत्री विजय यांनी सुरुवात तर चांगली केलेली आहे. आपली जातकुळी देखील द्रविडीयनच आहे असे सांगून त्यांनी एकाचवेळेला द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांची कोंडी केलेली आहे. त्यांनी राज्यकारभार उत्तम केला आणि तळागाळातील लोकांकडे विशेष ध्यान दिले तर ते दुसरे ‘एमजीआर’ बनू शकतात असे त्यांच्या समर्थकांना वाटते. ममता बॅनर्जी यांची ज्याप्रकारे पश्चिम बंगालमध्ये भाजपने कोंडी केली आहे त्याने त्यांची वाटचाल देखील मार्गदर्शक मंडळाकडेच सुरु झालेली आहे.

-सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.