महाकुंभमध्ये जीव गमाविलेल्यांचा आकडा द्यावा
अखिलेश यादव यांनी लोकसभेत योगी सरकारला घेरले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत महाकुंभमध्ये झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा जारी करण्यावरून भाजप सरकारवर निशाणा साधला. महाकुंभमध्ये 100 कोटी भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचा दावा केला जात होता, मग ही दुर्घटना कशी घडली? सरकार सातत्याने अर्थसंकल्पाचे आकडे देत आहेत, आता महाकुंभमध्ये जीव गमाविणाऱ्यांचेही आकडे द्यावेत. महाकुंभच्या व्यवस्थांविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलाविली जावी असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि खोया-पाया केंद्राची जबाबदारी सैन्याकडे सोपविली जावी. महाकुंभ दुर्घटनेत जीव गमाविलेल्या लोकांचा आकडा, जखमींवर उपचार, औषधे, डॉक्टर्स, भोजन, पाणी, परिवहनाच्या उपलब्धतेचे आकडे संसदेत सादर केले जावेत अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
आकडे लपविण्यात आले
महाकुंभमधील दुर्घटनेसाठी जबाबदार लोकांच्या विरोधात कठोर कारवाई केली जावी आणि सत्य लपविणाऱ्यांना शिक्षा व्हावी. जर कुणाचाच दोष नव्हता तर मग आकडेवारी का लपविण्यात आली असा प्रश्न डबल इंजिन सरकारला विचारू इच्छितो असे अखिलेश यादव यांनी लोकसभेत म्हटले आहे.
काही लोकांचा जीव गेला, त्यांचे पार्थिव शवागार अन् रुग्णालयात पडून असताना सरकारने हेलिकॉप्टरद्वारे महाकुंभमध्ये पुष्पवर्षाव केला. ही कशाप्रकारची सनातनी परंपरा आहे? चेंगराचेंगरी झाल्यावर कितीतरी चप्पल, कपडे अन् इतर गोष्टींचा ढिग जमा झाला होता, तो हटविण्यासाठी जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करण्यात आला. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी शोक-संवेदना व्यक्त केलेली नाही, भाजप सरकार आजही सत्य स्वीकारत नसल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.