हिंदीपेक्षा कन्नड विषयात अनुत्तीर्णाची संख्या अधिक
शिक्षण विभागाची लागणार कसोटी : तृतीय भाषा ग्रेडवरून राज्य सरकार उघडे
बेळगाव : नुकत्याच झालेल्या दहावी वार्षिक परीक्षेत हिंदी विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने तृतीय भाषेला ग्रेड देण्यावरून बराच गोंधळ माजला. परंतु प्रत्यक्षात दहावी परीक्षेतील निकालाने वेगळीच परिस्थिती समोर आली आहे. हिंदीपेक्षा कन्नड विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी राज्यात 19,000 विद्यार्थी कन्नड विषयात अनुत्तीर्ण झाल्याने तृतीय भाषेच्या ग्रेडवरून राज्य सरकार उघडे पडल्याचे दिसून आले.
दक्षिणेकडील विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकताना अडचणी येत असल्याचे कारण देत काही कानडी संघटनांनी तृतीय भाषेला विरोध केला होता. कानडी माध्यमासाठी प्रथम भाषा कन्नड, द्वितीय भाषा इंग्रजी व तृतीय भाषा हिंदी शिकवली जात आहे. हिंदी विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने थेट शिक्षणमंत्र्यांनी गुणांऐवजी ग्रेड देण्याची सूचना केली होती. परंतु न्यायालयाने ग्रेडऐवजी गुणच देण्यास सांगितल्याने यावर्षी दहावीच्या परीक्षेमध्ये गुण देण्यात आले.
आठवडाभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये प्रथम भाषा कन्नड घेतलेले 18,678 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर तृतीय भाषा कन्नड घेतलेले 289 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर गोंधळ माजलेल्या हिंदी विषयात मात्र 9,501 विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे हिंदी विषयाला विरोध करण्यापेक्षा कन्नड विषयात उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे.
प्रथम भाषा इंग्रजी असलेल्या माध्यमाचा निकाल 98.38 टक्के, हिंदी 98.15 टक्के, मराठी 97.6 टक्के, संस्कृत 99.99 टक्के, तमिळ 100 टक्के, उर्दू 98.44 टक्के तर कन्नड 96.92 टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षीपेक्षा कन्नड विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी तब्बल 90 हजार विद्यार्थी कन्नडमध्ये अनुत्तीर्ण झाले होते.