देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची संख्या वाढली
मास्टर कार्ड इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूटच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 2019 पेक्षा 21 टक्के यंदा अधिक राहिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 4 टक्के वाढली आहे. 2024 च्या पहिल्या तीन महिन्यातच 9.7 कोटी प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला असल्याचे दिसून आले आहे.
पहिल्यापेक्षा अधिक या वेळेला भारतीय मोठ्या प्रमाणात देशांतर्गत आणि देशाबाहेर विमान प्रवास करत आहेत असे दिसून आले आहे. यावर्षी पहिल्या तीन महिन्यांमध्ये 9.7 कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद झाली आहे. मास्टर कार्ड इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूट यांच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
यंदा मध्यमवर्गीयांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली असून त्याचप्रमाणे नव्याने विमानतळांची क्षमता वाढवली जात असून याचा फायदा विमान प्रवाशांनी घेतल्याचे स्पष्ट होते आहे.
2019 पेक्षा 21 टक्के अधिक
पहिल्या तीन महिन्यांमध्ये 9.7 कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. जवळपास दहा वर्षांमागे इतक्याच संख्येच्या प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. 2019 च्या तुलनेमध्ये पाहता यंदा देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 21 टक्क्यांनी वाढली असून हवाई उद्योगाकरीता ही दिलासादायी बाब ठरली आहे.
मुंबईत एप्रिलमध्ये 4.36 दशलक्ष जणांचा प्रवास
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या एप्रिल महिन्यात 4.36 दशलक्ष प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची माहिती आहे. प्रवाशांच्या संख्येत वर्षाच्या आधारावर पाहता 9 टक्के वाढ दर्शवली गेली आहे. कोरोनानंतर पाहता या विमानतळावर लक्षणीय वृद्धी दिसली असून एप्रिल 2022 च्या तुलनेत गेल्या महिन्यात संख्या 42 टक्के अधिक राहिली आहे.
कोणत्या देशांना पसंती
2019 च्या तुलनेत पाहता जपानला जाणाऱ्यांचे प्रमाण 59 टक्के, व्हिएतनामला जाण्याचे प्रमाण 248 टक्के इतके विक्रमी आणि अमेरिकेला जाणाऱ्यांचे प्रमाण 59 टक्के वाढीव नोंदवले गेले आहे. अॅमस्टरडॅम, सिंगापूर, लंडन, फ्रँकफर्ट आणि मेलबर्न या पाच विमानतळांवर मोठ्या प्रमाणात यात्रेकरूंनी प्रवास केल्याचीही माहिती समोर येते आहे.